प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड काढून घ्या. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे आवाहन.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड काढून घ्या.  जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे आवाहन.

सिंधुदुर्ग.

    प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक असल्याने सर्व  पात्र लाभार्थ्यानी  आपले कार्ड काढून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.
    केंद्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह जिल्ह्यामध्ये २३ सप्टेंबर २०१८ पासून राबविली जात आहे. या योजनेमध्ये १२०९ गंभीर आजारावर ५ लक्ष रुपयापर्यंतच्या शस्त्रक्रिया व उपचार अंगीकृत शासकिय व खाजगी रुग्णालयातून पूर्णतः मोफत केले जातात. हे आरोग्य विमा कवच प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लक्ष रुपये अशा स्वरुपात मिळत असते. या एकत्रीत योजनेमधून आतापर्यंत १९,५०८ लाभार्थ्यांना उपचार व शस्त्रक्रियांचा लाभ मिळाला आहे.
   कॅन्सर, हृदयरोगय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड विकार शस्त्रक्रिया मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग, जठर व आतडे शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, जळीत स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, नेत्र शस्त्रक्रिया (मोतीबिंदू वगळून), कृत्रिम अवयव, फुफ्फुस आजारावरील उपचार, एंडोक्राईन, इंटरव्हेशनल रेडीओलॉजी व होमटॉलॉजी इत्यादी सांधे प्रत्यारोपण (गुडघा, खुबा), लहान मुलांचा कर्करोग उपचार, मानसिक आजारांचा समावेश या योजनमध्ये करण्यात आला आहे.
     लाभार्थी- जिल्ह्यामध्ये पीएमजेएवाय चे ३२५१७२ लाभार्थी व एमजेपीजेएवाय चे ३३६९२२ असे एकूण ६६२०९४ पात्र लाभार्थी आहेत. रुग्णालये राज्यात या योजनेमध्ये एकूण सुमारे १००० रुग्णालये अंगीकृत आहेत. त्यापैकी २२६ शासकिय रुग्णालये असून ७९८ खाजगी रुग्णालये अंगीकृत आहेत. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय कणकवली, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी व लाईफटाईम हॉस्पीटल पडवे, डॉ. नागवेकर हॉस्पीटल कणकवली, संजीवनी हॉस्पीटल कणकवली, गुरुकृपा हॉस्पीटल कणकवली, सुयश हॉस्पीटल कुडाळ, संजीवनी बाल रुग्णालय सावंतवाडी, अंकुर हॉस्पीटल मालवण तसेच गोवा येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यायल बांबुळी या रुग्णालयाचा समावेश आहे.
   १ सप्टेंबर २०२३ पासून आयुष्मान भव या मोहिमअंतर्गत आयुष्मान ३.० उपक्रम जिल्ह्याभरात राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सर्व पात्र लाभार्थीना त्यांचे आयुष्मान कार्ड शासनाकडून केवायसीद्वारे तयार करून दिले जातात. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थी हे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचेही लाभार्थी आहेत. या प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत स्वस्त धान्य दुकानामार्फत  पोहचविणे शक्य आहे. याकरीता हे कार्ड तयार करण्यासाठी गावात विशेष कॅम्पचे आयोजन  दि. २५ ते ३१ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आलेले आहे.
Web Portal: https://beneficiary.nha.gov.in
Mobile Application: https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp  या लिंककरून अॅप डाऊनलोड करून लाभार्थी  बेनेफिशरी  (लाभार्थी) पर्याय निवडून स्वतःचे कार्ड स्वतः तयार करु शकतात. जिल्हा प्रशासनातर्फे या मोहिमेमध्ये सर्व ग्रामपंचायत सर्व आरोग्य केंद्र आणि शहरी भागात वार्डनिहाय कार्ड काढण्याची शिबिरे आयोजित केली आहेत. आतापर्यंत १,१९,७८२ पात्र लाभार्थीचे कार्ड तयार करण्यात आले आहे.