केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार.
नवीदिल्ली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी अर्थसंकल्पात कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव तरतूद केली जाणार आहे. यासह तरुण आणि महिलांच्या उत्थानासाठीही सरकार वेगवेगळ्या योजनांची घोषणा करू शकते. याचाच एक भाग म्हणून निर्मला सीतारामन लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात महिला, तरुण, शेतकरी आणि गरीबांवर लक्ष केंद्रीत केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच विद्यमान अर्थसंकल्प हा रोजगारावर भर देणारा, महिला स्वयंरोजगारात वाढ करणारा, त्याचप्रमाणे खाजगी गुंतवणुकीचा वेग वाढविण्यास मदत करण्यास सहाय्य करेल. तसेच या अर्थसंकल्पातून महागाई कमी होण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. 2024 च्या बजेटमध्ये सर्वासामान्य लोकांना मोठी आशा आहे. देशात मध्यमवर्गीय लोकांची संख्या जास्त आहे. ५ ते १५ लाखापर्यंत उत्पन्न असलेले लोकं अधिक आयटीआर दाखल करतात. पण यंदाच्या बजेटमध्ये करात सूट मिळावी अशी त्यांना आशा आहे. त्यामुळे बजेट २०२४ मध्ये काय घोषणा होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
केंद्र सरकार लखपती दीदी या योजनेसंदर्भातही काही घोषणा करण्याची शक्यता आहे. सोबतच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारतर्फे भरीवर आर्थिक तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. आंगणवाडी तसेच पोषण कार्यक्रमासाठी सरकार अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी काही खास तरतूद केलेली नव्हती. त्यामुळे यावेळची सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकार आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती आणखी वाढवण्याची शक्यता आहे. 70 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या वृद्ध व्यक्तीलादेखील या योजनेचा फायदा देण्याची तरतूद सरकारतर्फे केली जाऊ शकते. तशी अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.