शिष्यवृत्ती परीक्षेत देवरूखमधील पाध्ये इंग्लिश मिडियम स्कूलचा आयुष चव्हाण संगमेश्वर तालुक्यात प्रथम.

रत्नागिरी.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. इयत्ता पाचवीमधील विद्यार्थी आयुष हेमंत चव्हाण याने संगमेश्वर तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. या परीक्षेमध्ये आयुष चव्हाण याने ९८% गुण प्राप्त करून संगमेश्वर तालुक्यात प्रथम येऊन प्रशालेचा नावलौकिक वाढवला आहे.
इयत्ता आठवी मधील विद्यार्थी अनुराग भूपेश पंडित याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त केले आहे. आयुष आणि अनुराग यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल प्रशालेत छोटेखानी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, स्कूल चेअरमन राजेंद्र राजवाडे, मुख्याध्यापिका सोनाली नारकर आणि दीक्षा खंडागळे यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.