बाल वैज्ञानिकांच्या अंगी असलेल्या गुणांना चालना दिल्यास भारत तिसरी महासत्ता बनण्यास वेळ लागणार नाही : माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले.

बाल वैज्ञानिकांच्या अंगी असलेल्या गुणांना चालना दिल्यास भारत तिसरी महासत्ता बनण्यास वेळ लागणार नाही : माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले.

कुडाळ.

   भावी वैज्ञानिक हे आजच्या विद्यार्थ्यात दडलेले आहेत. या बाल वैज्ञानिकांच्या अंगी असलेल्या गुणांना चालना दिल्यास भारत तिसरी महासत्ता बनण्यास वेळ लागणार नाही. हा हेतू समोर ठेवून अशा विज्ञान प्रदर्शनाचा उपयोग झाला पाहिजे असे मत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी  सुभाष चौगुले यांनी व्यक्त केले.
    कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात माणगाव येथील श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात झाली. त्याच्या उद्घाटन प्रसंगी श्री. चौगुले बोलत होते. अध्यक्ष स्थानी सहाय्यक गटविकास अधिकारी श्यामजी चव्हाण होते. यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष सगुण धुरी,गुरुदास कुसागावकर, सरपंच सौ. मनीषा भोसले,उपाध्यक्ष बाळा जोशी,संस्था सीईओ श्री.वि न. आकेरकर,सचिव एकनाथ केसरकर,सहसचिव महेश भिसे,संचालक चंद्रशेखर जोशी, साईनाथ नार्वेकर, विजय पालकर, प्राचार्य प्रशांत धोंड,उपप्राचार्य श्री.संजय पिळणकर,पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण,अजित परब, गटशिक्षणाधिकारी श्री. संदेश किंजवडेकर, केंद्रप्रमुख श्री. तळवणेकर, सहाय्यक उपशिक्षणाधिकारी धनंजय मेंगाणे,सौ. मांडकुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
   नव वैज्ञानिकांच्यात ऊर्जा निर्माण करण्यासाठी श्री.चौगुले पुढे म्हणाले," मिसाइल मॅन माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना पायलट व्हायचे होते. पण परिस्थिती त्यांच्या विरुद्ध जात होती. निराशेच्या गर्तेत जाऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता पण त्यांच्या शिक्षकानी कलाम यांच्यातील निगेटिव्ह विचार बाजूला करून त्यांना नव्या उमेदीने वाटचाल करण्याची प्रेरणा दिली. म्हणूनच ते एक महान शास्त्रज्ञ बनले. त्याचप्रमाणे शिक्षक तुमच्यातील सुप्त गुण शोधून पाठीवर शाबासकीची थाप  मारत असतात, ऊर्जा निर्माण करत असतात, ते क्षण तुम्ही सत्कर्मी लावा असे झाल्यास जगात भारत ही तिसरी महासत्ता म्हणून उदयाला यायला वेळ लागणार नाही."
   सगुण धुरी म्हणाले," आज मानवाने केवळ विज्ञानाच्या जोरावरच अथक प्रगती केली आहे. अलीकडच्या काळात भारत सुद्धा या क्षेत्रात पुढे सरसावत आहे .या मातीत अनेक वैज्ञानिक तयार झाले. आता पुढेही होत राहतील. प्रत्येक शाळांनी अशा बाल वैज्ञानिकांना शोधून त्यांच्यात दडलेल्या गुणांना चालना द्यावी." यावेळी त्यांनी इंग्रजी शाळांचे स्मोत वाढल्याने मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत असल्याचे सांगून आमच्या भावना शिक्षणाधिकारी यांनी सरकारला कळवाव्यात असेही विचार मांडले. प्रास्ताविकात
गटशिक्षणाधिकारी श्री.संदेश किंजवडेकर म्हणाले," उडणारा पक्षी पाहून राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. झाडावरून फळ खालीच का पडले,वर दिसणाऱ्या रिकाम्या आकाशात  का गेले नाही? यावरून न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. अशी अनेक उदाहरणे देऊन त्यांनी आयुष्यातील विज्ञानाचे महत्त्व कथन केले.
   यावेळी श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाच्या मुलींनी सादर केलेल्या स्वागतपर गीताने सर्वांची मने जिंकली.या कार्यक्रमाचे औचित्य साधून अनेक मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. तीन दिवसाचे संपूर्ण जेवण व नाष्टा यांचा खर्च युवा उद्योजक तथा या शाळेचे माजी विद्यार्थी श्री. विशाल परब यांनी उचलल्याबद्दल त्यांचे खास आभार मानण्यात आले.