शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये Next GEN ई- हॉस्पिटल प्रणाली सुरु

सिंधुदुर्गनगरी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये सोमवार 2 जूनपासून Next GEN ई- हॉस्पिटल प्रणाली सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठता डॉ. अनंत डवंगे यांनी दिली आहे. शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नीत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन 500 रुग्ण खांटाचे रुग्णालय स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. नविन शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयाकरीता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय स्थावर जंगम मालमत्तेसह (किमान 20 एकर जागेसह) कायमस्वरुपी वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागास निशुल्क वापरास हस्तांतरीत करण्यात आले आहे. रुग्णसेवेचे आधुनिकीकरण व रुग्णसेवेमध्ये गती येण्याकरिता आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष मुंबई यांच्या कार्यालयाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे एचएमआयएस प्रणाली (Next GEN e- Hospital) सुरु करण्याबाबत सुचना प्राप्त आहेत. या प्रणालीव्दारे रुग्णसेवेचे आधुनिकीकरण होणार असून प्रत्येक रुग्णाची निदान व उपचारासंबंधीची माहिती तसेच तपासणीसंबंधीचे रिपोर्ट रुग्णालयातील अधिष्ठता तसेच सर्व संबंधित तज्ञांना उपलब्ध होणार आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयामध्ये नमूद असलेल्या दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) मर्यादेतील सर्व व्यक्ती, जेष्ठ नागरिक (वय 60 वर्ष व त्यावरील), स्वातंत्र्य सैनिक, निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले (18 वर्षाखालील) इत्यादी लाभार्थ्यांना आरोग्य सुविधा मोफत असतील. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार या प्रणालीमध्ये नोदणी करताना बाह्यरुग्ण, अंतररुग्ण नोंदणी शुल्क, विविध तपासणी शुल्क इत्यादी शुल्क शासकीय नियमानुसार आकारले जाणार आहे. तरी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सुचित करण्यात येते की, रुग्णसेवेशी संबंधीत सर्व योजनांचा लाभ घेण्याकरीता रुग्णालयामध्ये येताना आधार कार्ड, रेशन कार्ड इत्यादी तसेच आधार लिंक असलेला मोबाईल फोन सोबत आणावा असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.