पाट तिठ्यावरील दोन दुकाने आगीत बेचिराख

कुडाळ
कुडाळ तालुक्यातील पाट तिठ्यावर शिवाजी महाराज चौक शेजारीच असणारी दोन दुकाने आगीत बेचिराख झाली.शेजारीच विद्युत खांब असल्यामुळे शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेत दोन दुकानदारांचे साधारण ३०,००० रुपयाचे नुकसान झाले आहे. यामध्ये पाट तिठ्यावरील लक्ष्मण गोलतकर यांचे इस्त्रीचे दुकान होते. इस्त्री साठी आजूबाजूच्या परिसरातून आलेले कपडे त्यांनी आपल्या लाकडी कपाटात बंदिस्त ठेवले होते. ते जळून खाक झाले. या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकाला ही आग निदर्शनास आली. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कुडाळ एमआयडीसी मधील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले.या आगीची झळ शेजारीच असणाऱ्या रवींद्र गोसावी यांच्या जनरल स्टोअर्सला देखील बसली.परिस्थिती बेताचीच असताना आगीच्या दुर्दैवी दुर्घटनेमुळे दुकान मालक मात्र हतबल झालेत. दुकाना शेजारीच महावितराणाचा वीज खांब असून त्याचा डीपी ही उघड्या अवस्थेत असल्याचे दिसून येते. महावितरणच्या या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.