इस्रायल - हमासमध्ये पेटलेलं युद्ध शमणार? हमासने इजिप्त-कतारने दिलेला शस्त्रसंधी प्रस्ताव स्वीकारला.

इस्रायल - हमासमध्ये पेटलेलं युद्ध शमणार?  हमासने इजिप्त-कतारने दिलेला शस्त्रसंधी प्रस्ताव स्वीकारला.

    गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरू असून या युद्धाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल सात महिन्यांपासून सुरू असलेल्या गाझामधील युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. हमासने इजिप्त-कतारने दिलेला शस्त्रसंधी प्रस्ताव स्वीकारला आहे. मात्र, इस्त्रायलकडून याबाबत अद्याप कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाही.
   एकीकडे हमासने इजिप्त-कतारने दिलेला शस्त्रसंधी प्रस्ताव स्वीकारला असला तरी इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, इजिप्त- कतारच्या मध्यस्थीतील युद्धविराम प्रस्तावात दूरगामी निष्कर्ष आहेत, जे तेल अवीव स्वीकारण्यास तयार नव्हते. अशातच राफामधील मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असं इस्रायली पंतप्रधान कार्यालयानं नंतर एका निवेदनात म्हटलं आहे. युद्धविराम करारावर वाटाघाटी करण्यासाठी मध्यस्थ पाठवू, कारण हमासचा प्रस्ताव इस्रायलच्या आवश्यकता पूर्ण करत नाही, असंही इस्रायली पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे.
   इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थीनं मांडलेला शस्त्रसंधी प्रस्ताव हमासनं मान्य केला आहे. या युद्धबंदी प्रस्तावानुसार, गाझामध्ये इस्त्रायलसोबत सात महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध संपुष्टात येईल. सोमवारी हमासनं या प्रस्तावाबाबत एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, त्याचे राजकीय ब्युरो प्रमुख इस्माइल हनीयेह यांनी कतारचे पंतप्रधान आणि इजिप्तच्या गुप्तचर खात्याच्या मंत्री यांना हमासने युद्धविराम प्रस्ताव स्वीकारल्याचं सांगितलं आहे.