'मरूसागर एरणाकुलम अजमेर' एक्स्प्रेसला सिंधुदुर्ग स्थानकात थांबा......रेल्वे समन्वय समितीची मागणी पूर्ण
सिंधुदुर्गनगरी
कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाला मोठे यश मिळाले आहे. एनराकूलम-हजरत निजामुद्दीन मरू सागर अजमेर एक्सप्रेस गाडीला आता सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर अधिकृत थांबा मंजूर झाला आहे. या ऐतिहासिक निर्णयानंतर सिंधुदुर्ग स्टेशनवर या गाडीचे भव्य स्वागत करण्यात आले.
दुपारी सुमारे १.२० वाजता सिंधुदुर्ग स्टेशनवर पोहोचलेल्या गाडीचे मोटरमन, स्टेशन मास्तर आणि गार्ड यांना पुष्पगुच्छ देऊन व श्रीफळ अर्पण करून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर, सचिव अजय मयेकर, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष परशुराम परब, तसेच सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन संघटनेचे अध्यक्ष आप्पा मांजरेकर यांच्यासह स्थानिक सरपंच, ग्रामस्थ आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग या जिल्हा मुख्यालयावर जलद गाड्यांचा थांबा मिळावा, या मागणीसाठी प्रवासी संघटनांनी जनआंदोलन आणि निवेदनांद्वारे सातत्याने पाठपुरावा केला होता. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि कोकण रेल्वे प्रशासनाकडे हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. अखेर रेल्वे बोर्ड आणि कोकण रेल्वे रिजनल मॅनेजर शैलेश बापट यांच्या प्रयत्नांमुळे ही मागणी मान्य झाली.
या आधी झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग स्टेशनच्या सुशोभीकरणाच्या कामांना गती देणे, प्रवेशद्वाराचे काम पूर्ण करणे, तसेच जनशताब्दी आणि नेत्रावती गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी पुढील पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. तसेच भविष्यात वैभववाडी, नांदगाव आणि मडूरा स्टेशनलाही जलद गाड्यांचे थांबे मिळावेत, यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
शेवटी जिल्हा सचिव अजय मयेकर यांनी उपस्थितांचे आभार मानत, "प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेवरील दुपदरीकरण, नवीन गाड्यांचे थांबे आणि सेवा सुधारणा या आमच्या सातत्यपूर्ण मागण्या आहेत," असे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवासी चळवळीला मिळालेले हे यश भविष्यातील विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

konkansamwad 
