इराणच्या सर्वात अत्याधुनिक बंदरात शक्तिशाली स्फोट

इराण
इराणच्या एका प्रमुख बंदरावर मोठा स्फोट झाला आहे. येथील अनेक कंटेनरमध्ये स्फोट झाले असून स्फोटामुळे आग लागली. या घटनेत 500 हून अधिक लोक जखमी झालेत. या स्फोटाचे फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यातून स्फोटाची तीव्रता कळू शकते. फुटेजमध्ये बंदर परिसरातून दाट धूर बाहेर पडताना दिसतो. इराणच्या प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांपैकी इस्माईल मालेकीझादेह यांनी सरकारी टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार "हा स्फोट शाहिद रजई बंदराच्या एका गोदी भागात झाला. शाहिद रजई हे बंदर राजधानी तेहरानपासून 1000 किलोमीटर दक्षिणेस व हार्मुझच्या सामुद्रधुनीच्या उत्तरेस वसलेले आहे. हे इराणमधील सर्वात अत्याधुनिक कंटेनर बंदर असून, बंदर अब्बास शहराच्या 23 किलोमीटर पश्चिमेला आहे. या सामुद्रधुनीतून जगातील सुमारे एक पंचमांश खनिज तेलाची वाहतूक होते.स्फोटानंतर चार जलद कृती दले घटनास्थळी पाठवण्यात आली," असे हार्मुझगान रेड क्रिसेंट सोसायटीचे प्रमुख मुख्तार सलाहशूर यांनी सरकारी टीव्हीला सांगितले. या प्रांताच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख मेहरदाद हसन्सादेह यांनीही कंटेनर स्फोट हे या घटनेचे कारण असल्याचे म्हटले आहे. सध्या जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढून जवळच्या वैद्यकीय केंद्रांमध्ये हलवत आहोत असेही त्यांनी नमूद केले.