ममता बॅनर्जी यांच्याबद्दलचे मीम पोस्ट करणाऱ्याला कोलकाता पोलिसांचे समन्स. नेटिझन्सच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर पोलिसांवर समन्स हटवण्याची नामुष्की.
पश्चिम बंगाल.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मीम पोस्ट केल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका यूजरला नोटीस पाठवली होती. त्यात त्यांनी अपमानास्पद, प्रक्षोभक पोस्ट केल्याबद्दल त्याचा ठावठिकाणा विचारला होता. मात्र नेटिझन्सकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर कोलकाता पोलिसांनी ही ‘नोटीस’ मागे घेतली आहे.
एका यूजरने ममता बॅनर्जी यांच्यावरील मीम पोस्ट केल्यानंतर पोलिसांनी त्याला ऑनलाइन नोटीस पाठवली होती. त्यात ‘तुम्हाला नाव आणि निवासासह तुमची ओळख ताबडतोब उघड करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. मागितलेली माहिती न दिल्यास केल्यास, तुम्ही भारतीय दंड संहिता कलम ४२ अंतर्गत कायदेशीर कारवाईसाठी जबाबदार असाल,’ असे ट्विट कोलकाता पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकृत एक्स खात्याकडून करण्यात आले.
पोलिसांची ही कृती ‘असहिष्णू’ असल्याचे सांगत अनेक यूजरनी ही पोस्ट रिट्वीट केली. तसेच, अनेक यूजरनी हा व्हिडीओ तसेच, पोलिसांच्या ट्वीटचा उल्लेख करून शेअर केला. ममता बॅनर्जींवरील या व्हिडीओत त्या एका गाण्यावर नाचत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याला सुमारे ४०० रीट्वीट्स मिळाले.असे निदर्शनास आले आहे की तुम्ही सोशल मीडियाचा वापर आक्षेपार्ह, दुर्भावनापूर्ण आणि प्रक्षोभक पोस्ट टाकण्यासाठी करत आहात,” असे कोलकाता पोलिसांनी त्या वापरकर्त्याला दिलेल्या नोटिशीमध्ये नमूद केले आहे. ‘तुम्हाला याद्वारे उपरोक्त पोस्ट हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे न केल्यास कायद्यातील संबंधित तरतुदीनुसार कठोर दंडात्मक कारवाईला तुम्ही जबाबदार असाल,’ असे या नोटिशीत नमूद करण्यात आले होते.