आमदार निलेश राणे प्रमोद गावडेंच्या भेटीला
सावंतवाडी
निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी न मिळाल्याने आणि राजकारणातील अनुभवामुळे भावूक झालेले खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांची मनधरणी करण्यात अखेर आमदार निलेश राणे यांना यश आले आहे.तळवडे मतदारसंघातून उमेदवारीची अपेक्षा असताना संधी हुकल्याने नाराज झालेल्या गावडेंनी अपक्ष अर्ज दाखल केला होता, मात्र पक्षादेश पाळत त्यांनी माघार घेतली. अर्ज मागे घेताना त्यांना अश्रू अनावर झाले होते, ही बातमी समजताच निलेश राणे यांनी थेट त्यांचे निवासस्थान गाठले.प्रमोद गावडे हे गेल्या ३० वर्षांपासून नारायण राणे यांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले गेल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली होती. यावेळी नीलेश राणेंसोबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब हे देखील उपस्थित होते.निलेश राणे यांनी गावडेंचे सांत्वन करत त्यांच्या कार्याचा सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही दिली. राणे यांच्या या पुढाकारामुळे गावडेंची नाराजी दूर झाली असून, महायुतीच्या प्रचारात आता ते पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात आपल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्याची मनधरणी करण्यात राणे यशस्वी झाल्याने राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे.

konkansamwad 
