रशियामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; १५ पोलीसांसह अनेकांचा मृत्यू; ६ दहशतवाद्यांचा खात्मा.

रशियामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; १५ पोलीसांसह अनेकांचा मृत्यू; ६ दहशतवाद्यांचा खात्मा.

मॉस्को.

   रशियातील दागेस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये बंदूकधाऱ्या दहशतवाद्यांनी चर्च आणि पोलीस चौकीत घुसून अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात चर्चचे फादर यांच्यासह सुमारे १५ पोलिसांचा मृत्यू झाला असून या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या अचानक झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात ६ हल्लेखोरांना ठार करण्यात आले आहे.
   रशियामध्ये हल्लेखोरांकडून एकाच वेळी दोन ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. यात डर्बेंट आणि मखचकाला शहरीत चर्चचा तसेच पोलिस स्टेशनचाही समावेश आहे. दहशतवाद्यांनी चर्चमध्ये ऑटोमॅटिक शस्त्रांनी अंदाधुंद गोळीबार केला. एवढंच नव्हे तर दहशतवाद्यांनी डर्बेंटमधील फादर निकोले यांची देखील हत्या केली. क्रूरकर्मा दहशतवाद्यांनी त्यांचा थेट गळा कापला. मखचकला आणि डर्बेंटमध्ये प्रार्थना सभांवर हल्ला करण्यात आला. तसेच डर्बेंटमध्ये प्रार्थना सभेत आग लावण्यात आल्याने तो भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तसेच तेथील सुरक्षा रक्षकाचीही हत्या करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी ऑपरेशन लाँच करण्यात आले असून यामागे कोणाचा हात आहे? याचा शोध घेतला जात आहे.
   मखचकला येथे दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर रशियन कमांडो ॲक्शन मोडवर आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी चर्चवर अंदाधुंद गोळीबार केला. मात्र, आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. हल्ल्यानंतर  लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. शहरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. अज्ञात हल्लेखोरांनी सामाजिक परिस्थिती अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला नेमका कोणी आणि का केला याचा शोध सुरू असून मृत झालेल्या हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 लोकांनी चर्चेमध्ये आश्रय घेतला होता. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या हल्ल्यानंतर लोकांना शांतता राखण्याचे आणि घाबरून जाऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे.