'महापरिनिर्वाण' चित्रपट येत्या ६ डिसेंबरला होणार प्रदर्शित.

मुंबई.
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवान ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अखेरच्या दर्शनाकरता आणि अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरता प्रचंड प्रमाणात जनसागर उसळला होता. त्यांच्या अंत्ययात्रेला असंख्य समुदाय लोटला होता. त्यांच्या अनुयायांच्या हुंदक्यांच्या टाहोनं मुंबापुरीचा आसमंत व्यापला होता आणि या सगळ्या प्रसंगांचे साक्षीदार होते नामदेवराव व्हटकर.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरचा प्रवास आपल्या कॅमेरात टिपलेल्या या नामदेवराव व्हटकर यांच्या जीवनावर आधारित 'महापरिनिर्वाण' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता अनेकांना लागली होती.मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनची तारीख जाहीर झाली असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.चित्रपटाबद्दल निर्माते सुनील शेळके म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहोत.एक कथा दोन इतिहास' असे या चित्रपटाचे घोषवाक्य आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना व घटनांचा उलगडा करणाऱ्या नामदेवराव व्हटकर यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक यांनं साकारली असून अंजली पाटील, कमलेश सावंत, गौरव मोरे हे कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत.मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार, हे सध्यातरी गुपित आहे. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत,अभिता फिल्म निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेंद्र बागडे आणि अमर कांबळे डीओपी आहेत. तर लेखन चेतक घेगडमल आहेत.