सिंधुदुर्गात ३५ वर्षांतील सर्वात कमी पाऊस;२९ टक्के तुटीमुळे बळीराजा चिंतेत
कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिली असून 1 जून ते 22 ऑगस्ट 2026 या कालावधीत केवळ 1824.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कुडाळ येथील मुळदे कृषी हवामान वेधशाळेच्या 1991 सालापासूनच्या नोंदीनुसार गेल्या 35 वर्षांतील ही सर्वात कमी नोंद ठरली आहे.यंदा सरासरीच्या तुलनेत तब्बल 29.18 टक्के पावसाची तूट भासली असून, पावसाच्या उत्तरार्धातही म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ही घट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1991 नंतरच्या उपलब्ध आकडेवारीचा विचार करता यंदा जिल्ह्यात ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात कमी पाऊस पडला आहे.पाऊस उशिरा सुरू झाला असला तरी मधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे भातपिकाचे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. उलट या हवामानामुळे भातशेतीला काही प्रमाणात पूरक वातावरण मिळाले आहे. मात्र, भात पिकाची योग्य वाढ आणि उत्पादन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी येत्या 20 ते 25 दिवसांत दररोज 25 ते 30 मिमी पावसाची नितांत गरज आहे.दरम्यान, कोकणात पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत राहिल्याने अल निनोचा तीव्र परिणाम थेट जाणवलेला नाही. परंतु, पुढील वर्षाच्या परिस्थितीबाबत आताच अंदाज बांधणे कठीण असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
konkansamwad 
