होमगार्ड संदिप जाधव यांच्यावर आनंदवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

होमगार्ड संदिप जाधव यांच्यावर आनंदवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
होमगार्ड संदिप जाधव यांच्यावर आनंदवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

वेंगुर्ला.

  आनंदवाडी येथील रहिवासी होमगार्ड संदिप सदाशिव जाधव.(वय ३६ ) यांचे २२ रोजी सायंकाळी कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर आनंदवाडी येथील स्मशानभूमीत बिगुल वाजवून पोलीस व गृहरक्षक दलाकडून तीन वेळा रायफलची फायरींग करून सलामी देत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.होमगार्ड दलामध्ये कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावत असताना निधन झाल्याने जिल्ह्यामध्ये प्रथमच वेंगुर्ला येथे पोलीस व गृहरक्षक दलाच्या वतीने सलामी देण्यात आली.
   संदिप जाधव हे गेली १८ वर्ष  वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे गृहरक्षक(होमगार्ड) दलामध्ये कार्यरत होते.तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होते.न्यू स्टार आनंदवाडी क्रिकेट संघातील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती. तसेच सामाजिक क्षेत्रातही ते अग्रेसर होते.

   सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक सौरभकुमर अग्रवाल यांच्या आदेशाने व वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाने वेंगुर्ला आनंदवाडी येथील स्मशानभूमीत होमगार्ड कर्मचारी संदिप जाधव यांना पोलीस व गृहरक्षक दलाकडून तीन हवेमध्ये फायर करून व बिगुल वाजवून मानवंदना देत शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले.
   यावेळी वेंगुर्ला पोलीस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, पो.ह. बंटी सावंत, पी.एन.परब, पो.कॉ.खडपकर, पो.कॉ. प्रथमेश पालकर, होमगार्ड जिल्हा प्रशासकिय अधिकारी नागेश परब, केंद्र नायक अजय वाल्मिकी, सैनिक विठ्ठल परब, वेंगुर्ला तालुका समादेशक संतोष मातोंडकर, होमगार्ड प्रवीण गिरप, होमगार्ड कुडाळ अधिकारी संदेश गंगावणे, कविता पाताडे, सावंतवाडी होमगार्ड अधिकारी विष्णू धुरी, एस.सी.जंगले, डि.एन.महाडेश्वर, पो.कॉ. काळे, पो.कॉ.राठोड, श्री. बारहाट आदी कर्मचाऱ्यांनी सलामी दिली.
  यावेळी वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगरसेवक, नगर परिषद कर्मचारी, खेळाडू, तसेच राजकीय पदाधिकारी अंत्यविधीस उपस्थित होते.त्यांच्या अकाली जाण्याने खेळाडू तसेच पोलीस, गृहरक्षक दल, नगरपरिषद कर्मचारी, आनंदवाडी यांच्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
   त्‍यांचे पश्चात पत्नी, २ मुली, आई, भाऊ, वहिनी, पुतणे, काका, काकी चुलत भाऊ असा परिवार आहे.वेंगुर्ला नगरपरिषदेचे कर्मचारी सचिन जाधव यांचे ते भाऊ होत.