आंतरराष्ट्रीय योग दिन वेंगुर्ला येथे उत्साहात साजरा

वेंगुर्ला
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने वेंगुर्ला कॅम्प येथील कालेलकर नाट्यगृह सभागृहमध्ये योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात योगतज्ज्ञ डॉ. वसुधा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास व प्राणायामाचे विविध तंत्र शिकवण्यात आले. हा कार्यक्रम वेंगुर्ला नगरपरिषद, भारतीय जनता पक्ष वेंगुर्ला, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, लिनेस क्लब वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. योग दिनाच्या निमित्ताने विविध वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेऊन आरोग्य, मानसिक शांतता व आत्मशुद्धीचा अनुभव घेतला. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले आणि योग शिक्षक डॉ. वसुधा मोरे यांचा सर्वांच्यावतीने ॲड. सुषमा प्रभूखानोलकर यांनी शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला. योग हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग कसा होऊ शकतो, याबाबत जनजागृतीही करण्यात आली. या कार्यक्रमाला खर्डेकर काॅलजचे प्राचार्य धनराज गोस्वामी यांनी सुदृढ मन आणि शरीरासाठी योगाची आवश्यकता असल्याचे सांगितले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रा. नाईक यांनी केले. यावेळी नगर परिषदेचे अधिक्षक प्रशांत पाटील, सौ. संगिता कुबल, भाजप महिला तालुकाध्यक्ष सौ. सुजाता पडवळ, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ. वृंदा गवंडळकर, सहसंयोजक सौ. वृंदा मोर्डेकर, सुचित्रा रजपूत, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष हेमंत गावडे, सुरेंद्र चव्हाण, खर्डेकर काॅलजचे प्राध्यापक, प्राध्यापिका, लिनेस क्लब अध्यक्ष सौ.पल्लवी कामत, सौ. उर्मिला सावंत, बिना भाटीया उपस्थित होते.