बौद्ध बांधवांनी धम्माप्रति जागरूक असणे गरजेचे : प्रा.प्रमोद जमदाडे. कुडाळ येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.
कुडाळ.
भारताचा इतिहास हा क्रांतीचा व प्रतिक्रांतीचा आहे.तथागत भगवान गौतम बुद्धांच्या नंतर सम्राट अशोक राजाने या देशात क्रांती केली. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना देखील क्रांतीनंतर प्रतिक्रांती करावी लागली. बौद्ध धम्माचे मूळ भारत देश आहे.त्यामुळे प्रत्येक बौद्ध बांधवांनी धम्माप्रति जागरूक असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रा.प्रमोद जमदाडे यांनी कुडाळ येथे आयोजित कार्यक्रमात केले.
सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुके व गोवा विभाग यांच्या विद्यमाने ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि संस्थेचे संस्थापक दिवंगत वि.तु.जाधव यांचा जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभात त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग कदम (बावं), प्रमुख उपस्थिती आदरणीय धम्मचारी तेजबोधी, मुंबई केंद्रीय उपाध्यक्ष महादेव कदम (बांबार्डेकर), मुंबई केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सिध्दार्थ परुळेकर, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष प्रेमानंद जाधव, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सावंत, गोवा विभाग अध्यक्ष तुकाराम तांबोसकर, कुडाळ माजी तालुकाध्यक्ष दिगंबर पावसकर, बौद्धाचार्य सहदेव कदम (ओरोसकर), विद्याधर बांबुळकर, सावंतवाडी शाखा महिला सदस्या रेश्मा कासकर आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.प्रमोद जमदाडे असे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ झाली नागपूर येथे लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तो दिवस होता अशोका विजयादशमीचा.धम्मचक्र प्रवर्तन दिन हा विजयादशमी दिवशी साजरा केला पाहिजे. आज आपण ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत आहोत. यावेळी आपण सिंहावलोकन करणे गरजेचे आहे. आपल्या कार्याची निरंतर समीक्षा केली पाहिजे.जो धर्म कालसंगत नाही तो काळाच्या ओघात नष्ट होतो.जगात जी क्रिया-प्रक्रिया आहे ती निरंतर नाही ती नश्वर आहे. बुद्ध सांगतात एकच गोष्ट शाश्वत आहे तो म्हणजे 'बुद्धांचा धम्म' असा धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिला आहे. बुद्ध धम्माचा वारसा जपला पाहिजे हा वारसा वाचवण्याचे काम आपण केले पाहिजे असे ते म्हणाले.
याप्रसंगी सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुके व गोवा विभाग या संस्थेला मोलाचे सहकार्य व योगदान दिले अशा व्यक्तींचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यामध्ये प्राध्यापक प्रमोद जमदाडे, दिगंबर पावसकर, सहदेव कदम, भिवा जाधव (गुरुजी), वासुदेव जाधव (वेंगुर्ला), वासुदेव जाधव (सातार्डेकर गुरुजी), विष्णू आरोंदेकर, महेश परुळेकर, आदरणीय धम्मचारी तेजबोधी, सिध्दार्थ परुळेकर, राजेश कदम, विद्याधर बांबुळकर, महादेव कदम (बांबार्डेकर) आदींचा समावेश होता.
यावेळी विचारमंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच यावेळी सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघाचा ७० वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा कुडाळ तालुकाध्यक्ष पांडुरंग कदम, प्रा. प्रमोद जमदाडे, धम्मचारी तेजबोधी यांचे हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले व भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच दिवंगत वि.तु.जाधव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.यांनतर बौद्धाचार्य सहदेव कदम यांनी त्रिसरण पंचशील, बुद्ध पूजा, भिमस्तुती घेवून कार्यक्रमाची सुरुवात केली.यावेळी अश्र्वघोष सांस्कृतिक कलामंच पावशी शाक्यानगर यांनी स्वागतगीत व भीमवंदना गीत सादर केले.यावेळी संस्थेचे संस्थापक दिवंगत वि.तु.जाधव यांच्या कार्याचा आढावा घेणारी फिल्म डॉक्युमेंट्री(स्मृतीगंध) दाखवण्यात आली.यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथा घेवून करण्यात आली.यावेळी सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुके व गोवा विभागातील धम्म बांधव- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर जाधव, प्रस्ताविक सुप्रिया कदम यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार अविनाश चेंदवणकर यांनी मानले.