कोकण विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी यांचा राज्यस्तरीय सन्मान

कोकण विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी यांचा राज्यस्तरीय सन्मान

 

अलिबाग

      
महसूल दिनानिमित्त अलिबाग (जि. रायगड) येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमात कोकण विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वेंगुर्लेचे तहसीलदार ओंकार ओतारी यांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला रायगडचे खासदार सुनील तटकरे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल तसेच महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.पुरस्कार स्वीकारल्यानंतर तहसीलदार ओंकार ओतारी यांनी हा सन्मान आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली. हा पुरस्कार केवळ माझा नसून अनेकांच्या विश्वास, मार्गदर्शन, सहकार्य आणि प्रेरणेचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.या यशाचे श्रेय त्यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाला, वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाला तसेच आपल्या सर्व सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याला दिले. याशिवाय प्रत्येक सुख-दुःखात खंबीरपणे साथ देणाऱ्या कुटुंबीयांच्या प्रेम, विश्वास आणि पाठिंब्यामुळेच हा सन्मान प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले."या यशात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे. भविष्यातही अधिक जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि लोकाभिमुख सेवाभावाने काम करत राहण्याचा माझा निर्धार आहे," असेही ओतारी यांनी यावेळी सांगितले.तहसीलदार ओंकार ओतारी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल महसूल विभाग, प्रशासन तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.