दोडामार्ग येथील केर येथे हत्तींकडून माड, सुपारी, केळी बागांचे नुकसान
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील केर येथे हत्तींनी मोठा माड उन्मळून टाकला. शिवाय सुपारी व केळीच्या झाडांचाही फडशा पाडला. यात शेतकरी चंद्रकांत देसाई यांचे मोठे नुकसान झाले आहे. केर, मोर्ले परिसरात सध्या पाच हत्तींचा कळप वावरत आहे. हे हत्ती लोकवस्तीतही शिरकाव करत आहेत. हत्ती थेट केर गावातील शेतकरी चंद्रकांत देसाई यांच्या फळबागायतीत घुसले. बागायतीतील एक भला मोठा माड उन्मळून टाकला. याखेरीज केळींचा फडशा पाडला.सुपारीची झाडे उद्ध्वस्त केली. यात त्यांचे हजारोंचे नुकसान झाले. सध्या काजू पिकाचा हंगाम असल्याने शेतकरी काजू बागेत जात आहेत. मात्र हत्ती थेट लोकवस्तीत शिरकाव करू लागल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. हत्तीच्या कळपात दोन लहान पिल्ले असल्याने त्यांच्या बचावासाठी हत्ती आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाने या हत्तींचा वेळेत बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे.