टोपीवाला हायस्कूलच्या शिक्षिका ज्योती तोरसकर यांची ई- बालभारतीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड.
मालवण.
येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या शिक्षिका सौ. ज्योती रविकिरण बुवा तोरसकर यांची ई- बालभारती साठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळतर्फे निवड करण्यात आली आहे. सौ. तोरसकर या मराठी विषयात नेट व सेट परीक्षा आणि इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे मराठी विषयात नेट परीक्षेत त्यांनी देशात १४ वा क्रमांक पटकावला आहे.
ई-बालभारती, पुणे यांच्यामार्फत शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, परीक्षा स्वरुप, सराव करून परीक्षेत यश मिळविण्यासाठी आभासी अध्यापन तांसिका मार्गदर्शन सुरू केले आहे. त्यामध्ये इतिहास विषयाचे अध्यापन करण्यासाठी सहाय्यक शिक्षिका सौ. तोरसकर यांची तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून इयत्ता नववी व दहावीचे बालभारतीच्या माध्यमातून आभासी अध्यापन करण्यासाठी निवड झालेल्या त्या एकमेव शिक्षिका आहेत. ही निवड एक वर्षासाठी आहे. शालेय विद्यार्थ्यांना https://youtube.com/live/Y5uwZCATI00 ? feature=share या लिंकवरून नववी तसेच दहावीच्या सर्व विषयाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येऊ शकतो. बालभारतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत योग्य मार्गदर्शन पोहोचवणे शक्य झाले असल्यामुळे सौ. तोरसकर यांनी बालभारतीचे आभार मानले आहेत.
सौ.ज्योती तोरसकर (पूर्वाश्रमीच्या ज्योती रामगिरी बुवा ) सहाय्यक शिक्षिका म्हणून अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे कार्यरत आहेत. त्यांनी ग्रंथालय प्रमाणपत्र प्राथमिक अभ्यासक्रम १९९८, बॅचलर इन आर्टस् (मराठी) १९९८, मुंबई युनिव्हर्सिटी बॅचलर ऑफ एज्युकेशन (बीएड), २०००, मुंबई विद्यापीठ मास्टर्स इन आर्टस् (मराठी) २००८, शिवाजी विद्यापीठ, मास्टर्स इन आर्टस् (इतिहास) २०१७, शिवाजी विद्यापीठ, महाराष्ट्र प्राध्यापक अभियोग्यता परीक्षा (Set) इतिहास, २०२०, ( युजीसी व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे) महाराष्ट्र प्राध्यापक अभियोग्यता परीक्षा (Set) मराठी २०२१ (युजीसी व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे) प्रिलिमिनरी ईलिजिबिलिटी टेस्ट (PET) २०१६- मराठी प्रिलिमिनरी इलिजिबिलिटी टेस्ट (PET) २०१८ इतिहास, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट २०२२ मराठी देशात १४ वा - क्रमांक पटकाविला आहे. ई बालभारती साठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.