वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण...
वेंगुर्ला
बदलत्या हवामानामुळे निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई आणि खालावणारी भूजल पातळी लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंवर्धनाची व्यापक चळवळ सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने सुंदर भाटले येथे लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण करण्यात आला आहे. 'पाणी अडवा, पाणी जिरवा' ही काळाची गरज ओळखून राबविण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. जलसंधारण ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून ती लोकचळवळ व्हावी, हा संदेश देत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने स्वतः मैदानात उतरून श्रमदान केले. नगराध्यक्ष दिलीप गिरप आणि मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या श्रमदान मोहिमेत क्रीडा व सांस्कृतिक सभापती सचिन शेटये, बांधकाम सभापती प्रणव वायंगणकर, स्वच्छता व आरोग्य सभापती गौरी माईणकर, नगरसेवक संदेश निकम, प्रशांत आपटे, सदानंद गिरप, प्रितम सावंत, तसेच नगरसेविका सुमन निकम, सुषमा प्रभुखानोलकर, शीतल आंगचेकर, समिधा रेडकर आणि लीना म्हापणकर यांनी नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह हातात घमेले-फावडे घेऊन श्रमदान केले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांमध्ये माती-वाळू भरून हा पारंपरिक आणि कमी खर्चाचा वनराई बंधारा उभारण्यात आला. सुंदर भाटले परिसरातील वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे, हा या बंधाऱ्याचा मुख्य उद्देश आहे. या जलसाठ्यामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि इतर नैसर्गिक जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. उन्हाळ्यात जाणवणाऱ्या संभाव्य टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी आणि बिगर पावसाळी हंगामात पाण्याचे नियोजन करण्यासाठी हा बंधारा महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास नगरपरिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे. प्रशासन आणि नागरिक एकत्र येऊन दुष्काळमुक्तीचा लढा यशस्वी करत आहेत. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या संपूर्ण टीमने श्रमदानातून उभारलेल्या या जलसंधारण कार्याचे स्थानिक नागरिक आणि जिल्हा प्रशासनाकडून कौतुक होत आहे.
konkansamwad

