वेंगुर्ला येथे २४ ऑक्टोबरला 'द फोक आख्यान'चा विशेष प्रयोग.....दुष्काळ निवारणासाठी लोकचळवळ

वेंगुर्ला येथे २४ ऑक्टोबरला 'द फोक आख्यान'चा विशेष प्रयोग.....दुष्काळ निवारणासाठी लोकचळवळ

वेंगुर्ला

 

 महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव उलगडणारा लोककलाभिमुख 'द फोक आख्यान' या कार्यक्रमाचा विशेष प्रयोग येत्या २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता मेजर ध्यानचंद क्रीडांगण, वेंगुर्ला कॅम्प येथे आयोजित करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी निधी उभारणे हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्यात आणि जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता समाजाने एकत्र यावे, या भावनेतून वेंगुर्ला तालुक्यातील विविध सामाजिक संस्था एकत्र येऊन हा उपक्रम राबवत आहेत. या प्रयोगातून उभा राहणारा निधी दुष्काळ निवारण, जलसंधारण, जलसाठा वाढविणे आणि पर्यावरण संतुलनाच्या कामांसाठी वापरण्यात येणार आहे. ही एक निरंतर चालणारी लोकचळवळ असणार आहे.या कार्यक्रमाची संकल्पना सर्व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समोर आली असून कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा हा प्रयत्न आहे. जगाच्या पटलावर महाराष्ट्राची संस्कृती सादर करणारा हा लोकप्रिय प्रयोग वेंगुर्ल्यात होत असून तालुक्यासह जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दळवी यांनी केले.कार्यक्रमस्थळी बसण्याची क्षमता मर्यादित असल्याने नागरिकांनी आपली जागा आधीच बुक करावी. यासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाव नोंदणीला आजपासून सुरुवात झाली असून डोनर पासची किंमत १०० रुपये ठेवण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन दुष्काळ निवारणासाठी हातभार लावावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.या पत्रकार परिषदेला वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, माझा वेंगुर्लाचे राजन गावडे, बाळू खामकर, रोटरी क्लबचे योगेश नाईक, नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रशांत आपटे, प्रीतम सावंत, सदानंद गिरप, पंचायत समिती सदस्य आपा फणसेकर, कमलेश गावडे, तुषार साळगावकर, हितेश धुरी, भूषण आंगचेकर, राजबा सावंत, यतीन आवळेगावकर, राहुल पै, डॉ. काळे, कपिल पोकळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.