सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले येथील किराणा दुकानाला आग; लाखोंचे नुकसान
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले येथील एका किराणा दुकानाला काल रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.स्थानिक ग्रामस्थांना दुकानाला आग लागल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तातडीने दुकान मालकाला व बांदा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच बांदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंकज शिंदे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दुकानातील तेल, किराणा मालाने पेट घेतल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आगीची तीव्रता जास्त असल्याने कुडाळ आणि वेंगुर्ला येथील अग्निशमन दलालाही बोलावण्यात आले आहे.प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
konkansamwad 
