शासनाच्या माध्यमातून सावंतवाडीत 'ज्ञानियांचा राजा' कार्यक्रमाचे आयोजन
सावंतवाडी
ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला हा आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम येथील बॅ. नाथ पै सभागृहात उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याचा शुभारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर व्याख्याते गणेश शिंदे, अभिमन्यू लोंढे, विनायक गांवस आणि संयोजक सिद्धेश कुंठे उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी संत ज्ञानेश्वरांच्या बंडखोर आणि प्रगल्भ विचारांवर प्रकाश टाकला. तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात जाऊन ज्ञानाच्या मर्यादा ओलांडण्याचे धाडस माऊलींनी दाखवले, असे सांगत त्यांनी संतांनी दिलेल्या चिकित्सक वृत्तीचा वारसा जपण्याचे आवाहन केले. “हो मध्ये हो न मिसळण्याचा संदेश संतांनी दिला," असे सांगत त्यांनी ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान मानवी जीवनासाठी आजही मार्गदर्शक दीपस्तंभ असल्याचे नमूद केले. माऊलींच्या आपेगाव ते आळंदीपर्यंतच्या प्रवासाचे भावस्पर्शी वर्णन करत त्यांनी पसायदानाचा विश्वबंधुत्वाचा संदेश घराघरात पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे दुसरे आकर्षण म्हणजे गायिका सन्मिता धापटे-शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभंग गायन. 'अवघा रंग एक झाला' आणि 'बोलावा विठ्ठल' सारख्या अजरामर रचनांनी संपूर्ण सभागृह भक्तीरसात न्हाऊन निघाले. त्यांना विविध वाद्यांवर कसलेल्या कलाकारांनी साथसंगत केली. ज्ञानेश्वरांच्या पवित्र स्मृतींना स्वरांजली अर्पण करणाऱ्या या बहारदार कार्यक्रमाला सावंतवाडीकर रसि टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली.
konkansamwad 
