ग्रंथालयांनी काळाप्रमाणे स्वतःला 'अपडेट' करावे; आमदार निलेश राणे यांचे प्रतिपादन
कुडाळ
ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत, मात्र केवळ पगार आणि अनुदानाच्या मागण्यांवर न थांबता ग्रंथालयांनी स्वतःला काळाप्रमाणे अपडेट करणे गरजेचे आहे. वाचनालये टिकवण्यासाठी संस्थांकडून ठोस प्रस्ताव यायला हवेत, तरच शासन त्यावर सकारात्मक काम करू शकेल, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले. महाराष्ट्र शासनाचे ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय 'सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२५' चे उद्घाटन आज कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात झाले. याप्रसंगी आमदार राणे बोलत होते. आमदार राणे यांनी भाषणादरम्यान स्वतःचे उदाहरण देत सांगितले की, आजचे वाचन मोबाईल आणि आयपॅडवर होत आहे. त्यामुळे ग्रंथालयांनी केवळ पुस्तकांचे प्रदर्शन न भरवता, डिजिटल युगाशी सुसंगत बदल स्वीकारले पाहिजेत. ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमांचे कौतुक करतानाच त्यांनी ग्रंथालयांच्या अडीअडचणी पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच, पुस्तकांचा मान राखण्यासाठी त्यांचे मूल्य देऊनच ती स्वीकारली पाहिजेत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. या सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी पुस्तके जीवनाला दिशा देतात, असे सांगून वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कूल, देवबागच्या बालकलाकारांनी दशावतार नाटक सादर केले. सायंकाळच्या सत्रात कै. गंगाराम गवाणकर यांच्या साहित्यावर चर्चा झाली, ज्यात हेमंत पाटकर, प्रसाद खडपकर, प्रज्ञा चव्हाण आणि सोनाली गोडे यांनी सहभाग घेतला. प्रफुल्ल वालावलकर, डॉ. संजीव आकेरकर आणि वर्षा वैद्य यांचा 'श्रुतिका' हा कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश मसके यांनी केले, सूत्रसंचालन राजन पांचाळ यांनी तर आभार प्रदर्शन ॲड. संतोष सावंत यांनी केले. विविध प्रकाशकांनी लावलेल्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
konkansamwad 
