हिम्मत असेल तर येथून तेल टँकर काढून दाखवा', डोनाल्ड ट्रम्प यांना इराणचे खुले आव्हान

हिम्मत असेल तर येथून तेल टँकर काढून दाखवा', डोनाल्ड ट्रम्प यांना इराणचे खुले आव्हान


 

नवी दिल्ली

 

     होर्मुझ सामुद्रधुनी (स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ) मुद्द्यावर इराणने अमेरिका आणि इस्रायलला खुले आव्हान दिले आहे. इराणी लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जर खरोखर धाडस असेल, तर त्यांनी अमेरिकन युद्धनौकांच्या सुरक्षेतून तेल टँकर्सना या मार्गाने सुरक्षितपणे बाहेर काढून दाखवावे. जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतुकीच्या मार्गावर वाढलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात चिंता वाढली आहे.होर्मुझ सामुद्रधुनीबाबत इराणने अमेरिका आणि इस्रायलला नव्याने इशारा दिला आहे. यात ट्रम्प यांना थेट आव्हान देत तेल टँकर्सची सुरक्षा करून दाखवण्याचे सांगितले आहे.खरं तर होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक तेल व्यापारातील सर्वात महत्त्वाचा मार्ग मानला जातो. युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने इशारा दिला होता की, जर त्याच्या हितांना धक्का बसला तर तो होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांना रोखू शकतो. त्यानंतर शेकडो जहाजे होर्मुझ परिसरात अडकली असून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरही त्याचा परिणाम झाला आहे.दरम्यान, इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने स्पष्ट केले की इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केलेली नाही. मात्र इस्रायल आणि अमेरिकेशी संबंधित जहाजांना या मार्गाने जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (इराण रिव्होल्यूशनरी गार्ड्स) च्या प्रवक्त्याने म्हटले आहे, "आम्ही ट्रम्प यांना आव्हान देतो की त्यांनी होर्मुझमधून तेल टँकर्स बाहेर काढण्यासाठी अमेरिकन युद्धनौकांची सुरक्षा व्यवस्था करून दाखवावी."अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनीही होर्मुझबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्या मार्गाने जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे आणि यावर लवकरच तोडगा काढला जाईल.होर्मुझ सामुद्रधुनी हा अरुंद समुद्री मार्ग पर्शियन गल्फ ला गल्फ ऑफ ओमान आणि पुढे अरेबियन सी शी जोडतो. जगातील सुमारे २०% कच्चे तेल आणि जवळपास २५% नैसर्गिक वायू याच मार्गाने जगभर पाठवले जाते.सौदी अरेबिया, इराक, युनायटेड अरब एमिरेट्स आणि इराण  या देशांच्या ऊर्जा निर्यातीचा मोठा भाग या मार्गावर अवलंबून आहे. सध्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर येथे जहाजांची हालचाल जवळपास ठप्प झाली आहे.इराणसाठी हा मार्ग केवळ आर्थिक जीवनरेखा नाही, तर नौदल शक्ती दाखवण्याचे महत्त्वाचे साधनही आहे. इराणने येथे किनारपट्टीवरील क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि वेगवान लहान नौका तैनात केल्या असून त्यामुळे या परिसरातील त्याची सागरी क्षमता अधिक मजबूत झाली आहे.