पालकमंत्री असूनही उदय सामंत लीड देऊ शकले नाहीत, राणे कधीही माफ करणार नाहीत; निलेश राणेंचा इशारा.

सिंधुदुर्ग:
राज्यातील लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आता महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याचं दिसून येतंय. महायुतीत पहिली ठिणगी ही रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात पडली असून खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणेंनी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका केली. पालकमंत्री असूनही उदय सामंत हे नारायण राणेंना लीड का देऊ शकले नाहीत हे सांगावं असं निलेश राणे म्हणाले. सामंत जे वागले ते आम्ही कधीही विसरणार नाही असं सांगत राणे कधीही माफ करत नसतात असा इशाराही त्यांनी दिला.
पालकमंत्री असून देखील उदय सामंत आम्हाला लीड देऊ शकले नाहीत असा आरोप करत निलेश राणे यांनी उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यावर जोरदार टीका केली. निलेश राणे म्हणाले की, उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी जी डिलिव्हरी करायला हवी होती ती त्यांनी केली नाही. उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही मायनस आहोत. उदय सामंत यांनी लीड का दिलं नाही ते त्यांनी सांगावं. आम्ही रत्नागिरीमधून मताधिक्याची अपेक्षा ठेवली होती. उदय सामंत एक सिनियर लीडर आहेत, पण त्यांच्याकडून आम्हाला आकडे दिसले नाहीत.
सामंत जे वागले ते आम्ही कधीही विसरणार नाही. विजयी मिरवणुकीतही उदय सामंत दिसले नाही, ते का आले नाहीत हे त्यांनाच विचारा असं निलेश राणे म्हणाले.
निवडणुकीच्या काळात किरण सामंत यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेतल्याचा दावा निलेश राणे यांनी केला. त्याचे आपल्याकडे पुरावे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याची माहिती देणार असल्याचं निलेश राणे म्हणाले.