एलन मस्क यांच्याकडून गुंतवणूकदारांची दिशाभूल
अमेरिका
उद्योगपती एलन मस्क यांनी 'ट्विटर'च्या खरेदीआधी गुंतणूकदारांची दिशाभूल केल्याचा ठपका अमेरिकेतील न्यायमंडळाने (ज्युरी) ठेवला आहे. त्यामुळे मस्क यांना सुमारे २.६ अब्ज डॉलरची नुकसानभरपाई गुंतवणूकदारांना द्यावी लागण्याची शक्यता आहे. एलन मस्क यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये ४४ अब्ज डॉलरला ट्विटर विकत घेऊन नंतर 'एक्स' असे नामकरण केले. मस्क यांनी 'ट्विटर'चा ताबा घेण्यापूर्वी, मे २०२२ मध्ये केलेली दोन ट्ववीट आणि पॉडकास्टमधील विधाने वादाच्या भोवऱ्यात सापडली. 'ट्विटर'च्या खरेदीचा व्यवहार अनिश्चिततेच्या गर्तेत असताना मस्क यांच्या ट्विट आणि विधानांमुळे 'ट्विटर'चे समभाग घसरले. यादरम्यान ट्विटरच्या काही गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री केल्याने आपली फसवणूक झाल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणी सॅन फ्रान्सिस्को येथे दिवाणी खटला दाखल करण्यात आला. मस्क यांनी ट्विट आणि विधानांद्वारे 'ट्विटर'च्या समभागधारकांची हेतूपूर्वक फसवणूक केली होती का, याचा निर्णय घेण्याची जबाबदारी या न्यायमंडळाकडे होती. ट्विटरसोबतचा व्यवहार तूर्त स्थगित असल्याबाबतच्या एका ट्विटसह दोन ट्विटद्वारे मस्क यांनी गुंतवणूकदारांची दिशाभूल केली,' असे न्यायमंडळाने स्पष्ट केले. मात्र, त्यांनी हेतूपूर्वक कटाद्वारे फसवणूक केल्याचे आढळत नाही, असेही त्यांनी नमूद केले; परंतु न्यायमंडळाने समभागधारकांना नुकसानीपोटी प्रतिदिन प्रति समभाग तीन ते आठ डॉलरच्या भरपाई निश्चित केली. ही रक्कम सुमारे २.६ अब्ज डॉलर इतकी आहे, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले. मस्क यांची संपत्ती ८१४ अब्ज डॉलर इतकी आहे. 'हा केवळ गुंतवणूकदारांचा नव्हे; तर भांडवली बाजाराचा विजय आहे,' अशी प्रतिक्रिया याचिकाकर्त्यांचे वकील मार्क मोलुम्फी यांनी व्यक्त केली. या प्रकरणी अपील करण्यात येईल, असे मस्क यांच्या वकिलांनी सांगितले.
konkansamwad 
