मळगाव येथे प्रेरणादायी 'बलिदान मास' उपक्रमाचे आयोजन

मळगाव येथे प्रेरणादायी 'बलिदान मास' उपक्रमाचे आयोजन

सावंतवाडी 

 

      धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतुलनीय बलिदानाला अभिवादन करण्यासाठी मळगाव येथे प्रेरणादायी “बलिदान मास” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेच्या पटांगणावर या उपक्रमाची १८ फेब्रुवारीपासून उत्साहात सुरुवात झाली असून तो १८ मार्चपर्यंत अखंड सुरू राहणार आहे.मळगाव येथील शिवशंभू ग्रुप यांच्या पुढाकारातून प्रथमच हा उपक्रम राबविण्यात येत आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पराक्रमी जीवन, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा तरुण पिढीपर्यंत पोहोचावी, इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी आणि स्वाभिमान व राष्ट्रसेवेची भावना दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.या बलिदान मासांतर्गत दररोज सायंकाळी ७.०० ते ७.३० या वेळेत छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. त्यानंतर प्रेरणामंत्र, ध्येयमंत्र तसेच राष्ट्रनिष्ठा जागवणारे संदेश देण्यात येतात. इतिहासातील बलिदानाचे महत्त्व, स्वराज्यनिष्ठा, स्वाभिमान आणि देशसेवेचे मोल याविषयी नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे.शिवशंभू ग्रुप, मळगावचे सदस्य या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून मळगावसह परिसरातील नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.बलिदान मासात सहभागी होऊन इतिहासाची प्रेरणा घ्यावी आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश पुढे नेण्यात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवशंभू ग्रुप मळगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.