परुळेतील दोन कलावंतांना राज्यस्तरीय कला रत्न पुरस्कार २०२६ जाहीर
मालवण
आविष्कार फाऊंडेशन, मालवण यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘राज्यस्तरीय कला रत्न गौरव पुरस्कार 2026’ यंदा परुळे येथील दोन कलावंतांना जाहीर झाला आहे. नाट्य कलाकार श्री. विनोद राणे आणि कीर्तनकार आत्माराम गोसावी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आविष्कार फाऊंडेशन ही सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी संस्था आहे. संस्थेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवार, 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता हॉटेल जानकी, कुंभारमाठ कसाल-मालवण रोड, मालवण येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात शैक्षणिक, कला व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. श्री. विनोद राणे यांनी नाटकाच्या माध्यमातून कला क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाची विशेष नोंद घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी विजेत्यांनी सहकुटुंब, मित्रपरिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन आविष्कार फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, श्री. विनोद राणे आणि आत्माराम गोसावी यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. परुळे गावासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.
konkansamwad 
