मधुकर मातोंडकर यांना 'मास्तरांची सावली' पुरस्कार

वेंगुर्ले
मातोंड गावचे रहिवासी, कोकण रेल्वेचे प्रशासकीय अधिकारी तथा समाज, साहित्य चळवळीचे अग्रणी कार्यकर्ते मधुकर धोंडू मातोंडकर यांना 'मास्तरांची सावली' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईतील स्वामीराज प्रकाशन व कणकवलीतील प्रभा प्रकाशनतर्फे गुरुवार २७ मार्चला प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित केलेल्या 'सुर्वे मास्तरांचे' साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. मातोंडकर यांच्यासह प्रदीप आवटे, योगिता राजकर, सुनील उबाळे, सफर अली इसक आणि सुजाता राऊत या महाराष्ट्रातील विविध साहित्यिकांचाही 'मास्तराची सावली' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या या संमेलनात नारायण सुर्वे यांच्या गीतांचे शाहिरी गायन, परिसंवाद, चर्चासत्र, मुलाखत, निमंत्रितांचे कविसंमेलन, एकांकिका आणि 'आणखी एक मोहेन्जोदरो' या लघुपटाचे प्रदर्शन आदी विविधांगी कार्यक्रम होणार आहेत.मधुकर मातोंडकर हे गेली अनेक वर्षे कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.आपली नोकरी संभाळून त्यांनी चळवळीशी निगडित समाजकार्य केले असून समाज साहित्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम कार्य केले आहे. अनेक साहित्य संस्थांशी निगडित असलेले मातोंडकर उत्तम नियोजकही आहेत.अनेक संस्थांच्या साहित्य संमेलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दर्शविला आहे. समाज प्रबोधन या एकाच धेय्यातून त्यांनी अनेक सामाजिक कविता लिहिल्या असून आपल्या कवितेतून त्यांनी समाजातील अराजकतेवर सडेतोड वार केले आहेत.गेली अनेक वर्षे त्यांच्याकडून सुरू असलेल्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.