दशावतार साहिल लाड यांना 'राष्ट्रीय लोक गौरव सन्मान' पुरस्कार प्रदान

दशावतार साहिल लाड यांना 'राष्ट्रीय लोक गौरव सन्मान' पुरस्कार प्रदान

सावंतवाडी

 


     सिंधुदुर्गातील दशावतार लोककलेचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे अभ्यासू युवा कलाकार कृष्णा उर्फ साहिल शंकर लाड यांना 'राष्ट्रीय लोक गौरव सन्मान परिषद गोवा-महाराष्ट्र राज्य २०२६' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आर्ट्स टुरिझम अँड कल्चर फेस्टिवल समिती गोवा आणि नागेश महारुद्र फाउंडेशन गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी येथील कला व संस्कृती भवन येथे हा सोहळा दिमाखात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सेट कुझ गोवा आमदार रोडॉल्फो फर्नांडिस, निवृत्त प्राध्यापक उल्हास प्रभू देसाई आणि प्रसिद्ध मराठी अभिनेते अभय खडपकर यांसारखे दिग्गज मान्यवर उपस्थित होते. साहिल लाड हे गेल्या १४ वर्षापासून दशावतार कला क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या प्रवासाची सुरुवात शालेय जीवनात इयत्ता चौथीमध्ये असताना स्नेहसंमेलनापासून झाली. लहानपणी जत्रेच्या वेळी आई-वडिलांनी आवर्जून नाटक पाहायला नेल्यामुळे त्यांच्यावर या कलेचे संस्कार झाले, म्हणूनच ते आपल्या आई-वडिलांना आपले पहिले गुरु मानतात. त्यांनी आतापर्यंत सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ मुंबई, खानोलकर दशावतार नाट्य मंडळ खानोली, बोर्डेकर दशावतार नाट्य मंडळ दोडामार्ग, मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड आणि रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ हुमरस अशा विविध नामांकित कंपन्यांमध्ये काम केले असून, सध्या ते जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस दांडेली (सावंतवाडी) येथे कार्यरत आहेत. साहिल यांना या क्षेत्रात काम करताना शंकर पिळणकर, गोविंद मराठे, विनोद घोणे, शंकर मेस्त्री, गणपत मांजरेकर, विलास गवस, गौरव शिर्के, दादा राणे, सिद्धार्थ मेस्त्री, ज्ञानेश्वर नाईक आणि नारायण आशियेकर अशा अनेक ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी पंढरी घाटकर, चारुदास मांजरेकर, प्रथमेश मेस्त्री आणि रमेश शिरोडकर यांच्या भूमिकांना आपला आदर्श मानून आपली अभिनय शैली विकसित केली आहे. आपल्याला मिळालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराचे संपूर्ण श्रेय त्यांनी ज्येष्ठ कलाकार दादा राणे यांना दिले आहे. या बहुमानामुळे त्यांच्या हुमरस गावासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.