पाट येथे सकल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

पाट येथे सकल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

कुडाळ


      राष्ट्र, धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सावंतवाडीचे डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी पाट येथे आयोजित सकल हिंदू संमेलनात केले.रविवारी पाट, ता. कुडाळ येथे सकल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. संमेलनापूर्वी पाट तिठा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पारंपरिक वेशभूषा व स्फूर्तिदायक घोषणांसह शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारत मातेच्या प्रतिमापूजनाने झाली. मुख्य संयोजक राजेंद्रप्रसाद देसाई, महिला संयोजक सुरेखा तेली, प्रमुख अतिथी सुरेश पाटील व प्रमुख वक्ते डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रवीणकुमार ठाकरे म्हणाले, “आज देशात हिंदू बहुसंख्य असूनही धर्मावर संकटे येत आहेत, कारण आपण एकत्र नाही. आपण धर्म व संस्कृती विसरलो तर पुढील काळात टोपी व बुरखा घालण्याची वेळ येईल. एकत्र कुटुंब पद्धती नष्ट झाली, संवाद कमी झाला. आता राष्ट्र, धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी सर्व हिंदूंनी एकत्र आले पाहिजे.”प्रमुख अतिथी सुरेश पाटील, आंदुर्ले, सनातन संस्था यांनी सांगितले की, “देव, देश व धर्मरक्षणाचे कार्य करताना साधना करून भगवंताचे अधिष्ठान प्राप्त करा. सत्य, सद्वर्तन, राष्ट्रभक्ती ही मानवी मूल्ये जपली पाहिजेत. आज मनुष्य सुखी आहे पण आनंदी नाही, कारण आपण संस्कृती विसरलो. धर्माप्रमाणे आचरण व नामसाधना करून आनंदी जीवन जगा.”संमेलनाचा उद्देश प्रमुख संयोजक राजेंद्रप्रसाद देसाई यांनी विशद केला, तर महिला संयोजक सुरेखा तेली यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन व आभार संयोजन समितीचे प्रथमेश नाईक यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप रघुनाथ जुवाटकर यांनी म्हटलेल्या पसायदानाने झाला.