विरोधकांचा आवाज दाबला जाणार नाही : ॲड. निता सावंत-कविटकर 

विरोधकांचा आवाज दाबला जाणार नाही : ॲड. निता सावंत-कविटकर 

सावंतवाडी


   सावंतवाडी नगरपरिषदेच्या कामकाजावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. नगरपरिषदेच्या सभेत विरोधी पक्षाने विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक आणि समर्पक उत्तरे नगराध्यक्षा देत नाहीत, असा थेट आरोप शिवसेना नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांनी केला आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे ॲड. सावंत यांनी आपली नाराजी व्यक्त करताना इशारा दिला की, विरोधी पक्षाचा आवाज दाबला जाणार नाही. नगरपरिषदेच्या सभेत जेव्हा जनहिताचे किंवा प्रशासकीय त्रुटींबाबत प्रश्न विचारले जातात, तेव्हा नगराध्यक्षांकडे त्यांची योग्य उत्तरे नसतात, असे त्यांनी म्हटले आहे.“प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतो. सभेमध्ये ‘मोठ्या आवाजात बोलू नका’ अशा सूचना दिल्या जातात. मात्र नगराध्यक्षांनी विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मुळीच करू नये. आमचा आवाजच मुळात मोठा आहे आणि तो जनतेच्या अन्यायाविरोधात असाच उठत राहील,” असे ॲड. निता सावंत यांनी पत्रकात नमूद केले आहे.त्यांनी पुढे आवाहन केले की, “आमचा आवाज दाबण्यापेक्षा तो ऐकून घेण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी ठेवावी.” या पत्रकामुळे सावंतवाडीच्या राजकीय वर्तुळात आता सत्ताधारी आणि विरोधकांमधील कलगीतुरा अधिकच रंगण्याची चिन्हे आहेत.