अंशतः अनुदानित शिक्षकांचे २२ जून पासून आझाद मैदानावर धरणे......१ जून पासून वाढीव टप्पा देण्याची शिक्षक समन्वय संघाची मागणी
मुंबई
महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित तत्वावर अर्थात २०%,४०%,६०%,आणि ८०% अनुदानावर सुरु असलेल्या प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांना १ जून २०२६ पासून वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा द्या अशी मागणी करणारे पत्र शिक्षक समन्वय संघामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.या मागणी साठी शिक्षक समन्वय संघामार्फत मुंबई च्या आझाद मैदानावर २२ जून पासून निर्णय लागे पर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.निवेदनात नमूद केल्या प्रमाणे सद्य स्थितीत २०,४०, ६०,८०, टक्के वर असलेल्या प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांना १ जून २०२६ पासून वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा द्या.१२,१५,२४ फेब्रुवारी २०२१ च्या शासन आदेशात त्रुटीत सापडलेल्या परंतु ३० दिवसाच्या आत त्रुटी पूर्तता करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांना १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशानुसार मानीव वैकल्पीक टप्पा देण्यात आला होता.परंतु २५ ऑगस्ट २०२५ च्या शासन आदेशात अशा शाळा मानीव टप्पा वाढ देण्यापासून रद्द ठरल्या.शासनाने शुद्धीपत्रक काढून अथवा शासन आदेश काढून संबंधित शाळांना समान,प्रलंबित टप्पा द्यावा अशी मागणी निवेदनात नमूद केली आहे.शिवाय पुणे स्तरावरील अघोषित शाळांची यादी अनुदानासाह घोषित करावी, अंशतः अनुदानित शिक्षकांच्या नोकऱ्या विना वेतन ते अल्प वेतनावर संपुष्टात आल्या आहेत.अशा सर्व अंशतः अनुदानित शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्याना ठोस अशी पेन्शन योजना लागू करावी.अंशतः अनुदानित शाळा,कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वैद्यकीय वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करावी.अंशतः अनुदानित शाळा,कनिष्ठ सेवा करणाऱ्या शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्यात यावे.अशा काही लक्षवेधी मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या आहेत.शासनाने या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.शिक्षक समन्वय संघात प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या सुमारे १० संघटना एकत्र आल्या आहेत.शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक खंडेरावं जगदाळे, पुंडलिक रहाटे,भारत जामनिक आदिनी स्वाक्षरीनिशी निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यात आले ,शिवाय याची प्रत उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे,श्रीमती सुनेत्रा पवार, शिक्षण मंत्री दादा भुसे यांना देण्यात आले आहे.
konkansamwad 
