१८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींनी मतदार नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावावा : जगदीश कातकर. कणकवली कॉलेज मध्ये नव-मतदार नोंदणी अभियान संपन्न.

१८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींनी मतदार नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावावा : जगदीश कातकर.  कणकवली कॉलेज मध्ये नव-मतदार नोंदणी अभियान संपन्न.

कणकवली.

   युवकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान व निवडणूक यंत्रणेकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. समाजाच्या प्रगतीसाठी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. म्हणून १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व युवक-युवतींनी मतदार नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले.
    तहसिलदार कार्यालय, कणकवली आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कणकवली कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नव-मतदार नोंदणी व जनजागृती अभियान २०२३ या कार्यक्रमात श्री. कातकर बोलत होते. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे चेअरमन प्रा.डॉ. राजश्री साळुंखे, नायब तहसिलदार शिवाजी राठोड, गौरी कट्टे-पाटील, प्रिया परब-हर्णे आणि प्राचार्य युवराज महालिंगे उपस्थित होते. नव-मतदारांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. राजश्री साळुंखे म्हणाल्या की, युवा पिढीने मतदान प्रक्रिया व जनजागृतीमध्ये सक्रिय भाग घेतल्यास लोकशाहीला पूरक वातावरण निर्माण होईल.नव-मतदार अभियाना सारखे  उपक्रम लोकशाही बळकट करण्याची प्रक्रिया आहे. अभियान प्रसंगी प्राचार्य युवराज महालिंगे यांनी अभियान आयोजन प्रसंगी सहकार्य व उपस्थितीसाठी सर्व मान्यवरांचे आभार मानले व नव-मतदारांना शुभेच्छा दिल्या.
   मतदार नोंदणी शिबिरामध्‍ये १६७ विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केली. तसेच महसूल विभागामार्फत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले उपलब्ध व्हावेत व आधार नोंदणी व दुरुस्ती करता यावी यासाठी महाविद्यालयामध्ये यंत्रणा पुरविण्यात आली, याचाही विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.अभियानाच्या शेवटी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कणकवली शहरामध्ये मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन मा. तहसिलदार दिक्षांत देशपांडे व निवडणूक नायब तहसिलदार प्रिया परब-हर्णे, निवासी नायब तहसिलदार गौरी कट्टे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश पाटील, प्रा. सागर गावडे, प्रा. अदिती मालपेकर, प्रा. प्रवीण कडूळकर, प्रा. पूजा मुंज, सेतू कर्मचारी, डाटा ऑपरेटर आणि कणकवली परिसरातील बी.एल.ओ. यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांच्या सहकार्याने केले. प्रसंगी ३०० विद्यार्थी उपस्थित होते.