तळेरे येथील आयोजित जिल्हास्तरीय आकाश कंदील स्पर्धेत रोशनी बागवे प्रथम.

तळेरे येथील आयोजित जिल्हास्तरीय आकाश कंदील स्पर्धेत रोशनी बागवे प्रथम.

कणकवली.
 
   तळेरे येथे दिपावली निमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय आकाश कंदील स्पर्धेत शिरगाव येथील रोशनी संतोष बागवे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेत कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा असलदे येथील दीविजा वृध्दाश्रम, सुनील तळेकर ट्रस्ट व वाचनालय आणि प्रज्ञांगन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
   या स्पर्धेचे उद्घाटन दीविजा वृध्दाश्रमचे सचिव संदेश शेट्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर, सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांत तळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, उपाध्यक्ष राजू वळंजू, सचिव मिनेश तळेकर, प्रज्ञांगनच्या श्रावणी मदभावे, राजू जठार, शशांक तळेकर, स्पर्धेचे परीक्षक उदय दुदवडकर, ऋतू महाडिक, सागर पांचाळ, प्रा. हेमंत महाडिक आदी उपस्थित होते.
   दरवर्षी दिपावली निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी जिल्हास्तरीय आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी पर्यावरण पूरक आकाश कंदील द्यायचा होता. पर्यावरण रक्षण होण्यासाठी, त्यातून जनजागृती व्हावी आणि ती आजच्या पिढीमध्ये रुजावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: प्रथम रोशनी संतोष बागवे (शिरगाव), - द्वितीय- वैष्णवी गोपाळकृष्ण सुतार (तिवरे), तृतीय- रुची रवींद्र भोगले (दारूम), उत्तेजनार्थ दुर्वा रुपेश केळुसकर - (कणकवली) या विजेत्यांना अनुक्रमे रोख रक्कम रुपये 1001, 701, 501 व 301 तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
   यावेळी परीक्षक उदय दुदवडकर, सोनिया केळुसकर, रोशनी बागवे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली मांजरेकर यांनी तर श्रावणी मदभावे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्मितेष पाश्टे, दत्तराज राणे, शुभम परब, विनय गोडे, रोशन कांबळे, जयश्री तायशेट्ये, तेजल सावंत, तन्वी चिंदरकर, नयन गुंडये, वाचनालयाचे ग्रंथपाल साक्षी तळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.