'मैफील' काव्यसंग्रहाचे इंस्टाग्रामवर प्रकाशन.....नवकवींना व्यासपीठ देणारा उपक्रम - अजिंक्य जाधव

'मैफील' काव्यसंग्रहाचे इंस्टाग्रामवर प्रकाशन.....नवकवींना व्यासपीठ देणारा उपक्रम - अजिंक्य जाधव

वैभववाडी

 

      प्रेम, विरह, निसर्ग, आत्मसंवाद, सामाजिक जाण यांसारख्या विविध विषयांवरील कवितांमुळे वाचकांमधील औत्सुक्य सतत ताजे ठेवणाऱ्या 'मैफील' या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन लेखक, अभिनेते विठ्ठल नागनाथ काळे यांच्या हस्ते इंस्टाग्राम या सोशल मीडिया व्यासपीठाच्या माध्यमातून झाले.'प्रत्येक लेखकाने किमान एक वाचक निर्माण करावा' काव्यसंग्रहाचे संकलक व संपादक अजिंक्य जाधव म्हणाले, "आजच्या ऑनलाईन युगात अभिजात भाषा जपण्याची जबाबदारी लेखक, कवी आणि वाचकांवर आहे. प्रत्येक कवीने-लेखकाने किमान एक तरी वाचक निर्माण करणे गरजेचे आहे. नवकवींना लिहिते करण्यासाठी मार्गदर्शन आणि एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने अनेक नव्या-जुन्या कवींना त्यांच्या कवितांच्या माध्यमातून एकत्रित आणून करिष्मा जाधव यांच्या अनुराधा प्रकाशनाच्या सहकार्याने 'मैफील' काव्यसंग्रहाची निर्मिती केली आहे." सोमवार दि. 1 जून 2026 रोजी प्रकाशित झालेल्या या काव्यसंग्रहात एकूण 49 कवींच्या 58 कविता समाविष्ट आहेत. प्रेम, विरह, निसर्ग, आत्मसंवाद, जीवनातील क्षणभंगुरता अशा विविध विषयांचा सुंदर समतोल या संग्रहात साधला गेला आहे. कवितांना कुठल्याही एका विषयाचे बंधन नसल्यामुळे वाचकांना खरोखरच एका सुरेख मैफिलीचा अनुभव येईल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.लोकप्रिय मराठी लेखिका काजल कामीरे यांनी पत्राद्वारे या काव्यसंग्रहाला शुभेच्छा दिल्या आहेत. तर लेखिका वृंदा कांबळी यांनी, "सदर काव्यसंग्रहात तोचतोचपणा नसल्यामुळे पुढील कवितेत काय असेल याचे औत्सुक्य सतत ताजे ठेवणारा असा हा काव्यसंग्रह प्रत्येक काव्यप्रेमींनी वाचावा" असे आवाहन केले आहे.हा काव्यसंग्रह ebook shopizen website वर तसेच मुद्रित प्रतीमध्येही उपलब्ध असल्याची माहिती अजिंक्य जाधव यांनी दिली. मुखपृष्ठ रोहन नेरुरकर यांनी केले असून अक्षर जुळणी रुपेश मेस्त्री यांची आहे. डॉ. प्रणव प्रभू, सिद्धी महाजन, विजय मरळकर, किशोर नाईक, सदानंद जांभवडेकर, सुजित कदम, सुरज घोणे यांचे मार्गदर्शन व विशेष सहकार्य या काव्यसंग्रहास लाभले आहे.