किर्लोस येथे भवानी स्वयं सहायता समूहाचे 'एकत्रित खरेदी विक्री केंद्र' सुरू.....२ टन काजू बी प्रक्रियेचे उद्दिष्ट

किर्लोस येथे भवानी स्वयं सहायता समूहाचे 'एकत्रित खरेदी विक्री केंद्र' सुरू.....२ टन काजू बी प्रक्रियेचे उद्दिष्ट

मालवण

 

     मालवण तालुक्यातील किर्लोस येथील भवानी स्वयं सहायता समूहाने एकात्मिक शेती प्रभाग (IFC) विकास प्रकल्प अंतर्गत एकत्रित खरेदी विक्री केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामार्फत हंगामानुसार काजू, भात, भुईमूग, नाचणी, नारळ व इतर शेतीमालाची खरेदी-विक्री केली जाणार आहे. या वर्षी 2 टन काजू बी प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट भवानी गटाने ठेवले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शेतीमाल खरेदीचा शुभारंभ कार्यक्रम किर्लोस येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रदीप सावंत, उमेदचे तालुका समन्वयक रविकिरण कांबळी, आडवली-मालडी प्रभागच्या अध्यक्ष सौ. धुरी, सचिव सौ. चव्हाण, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, मालवण तालुका ब्लॉक अँकर सचिन किर्लोस्कर, ग्रामसखी चव्हाण, तलाठी, ग्रामसेवक, पोस्ट मास्टर, CRP, ग्रामपंचायत सदस्य प्रविण घाडीगावकर आणि कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ सावंत सर उपस्थित होते.  IFC प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बचत गटांना शेतीमालावर प्रक्रिया करून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या केंद्रामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल आणि मध्यस्थांशिवाय थेट विक्री करता येईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. भवानी बचत गटाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.