'वैभव नाईक यांनी राजन तेलींचे पाय धरावेत'...अरविंद करलकर यांचा घणाघात

'वैभव नाईक यांनी राजन तेलींचे पाय धरावेत'...अरविंद करलकर यांचा घणाघात

कुडाळ


      माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्यावरील आरोप तातडीने थांबवावेत. खरं तर वैभव नाईक यांनी *राजन तेली यांचे पाय धरले पाहिजेत, कारण त्यांच्याच माध्यमातून शहर विकास आघाडी आकाराला आली होती, असा घणाघाती हल्ला शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी केला.शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोशल मीडिया प्रमुख राजवीर पाटील आणि सरचिटणीस सुशील कदम उपस्थित होते.  
      करलकर म्हणाले, "आमदार निलेश राणे हेच या निवडणुकीत स्टार प्रचारक होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली गेली. म्हणूनच निलेश राणेंचाच फोटो घेऊन रॅली काढण्यात आली होती. आता नैतिक जबाबदारी स्वीकारून दोन्ही भावांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत."  वैभव नाईक यांच्यावर गंभीर कौटुंबिक आणि राजकीय टीका करताना करलकर म्हणाले, "वैभव नाईक यांचे स्वतःचे भाऊ पुढे जात आहेत, प्रगती करत आहेत, म्हणूनच आता वैभव नाईक यांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. भावांना निवडून आणले दुसऱ्यांनी आणि आता ते उड्या मारत आहेत."          नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी वैभव नाईक हे स्वतः मालवणमध्ये ठाण मांडून बसले होते, याकडे लक्ष वेधत करलकर म्हणाले, "जे स्वतः मालवण सोडून बाहेर पडू शकले नाहीत, ते कणकवलीत जाऊन प्रचार कसा करणार? त्यामुळे त्यांचे दावे हास्यास्पद आहेत."  
    उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनाचा समाचार घेताना करलकर म्हणाले, "महागाईच्या नावाखाली जे आंदोलन करण्यात आले, ती केवळ एक 'नौटंकी' होती. कोथिंबीरची जुडी किंवा इतर भाजीपाला कधी स्वस्त तर कधी महाग होतच राहतो. बाजारभावातील हा चढ-उतार नैसर्गिक आहे. जर भाजीपाल्याला चांगला भाव मिळाला, तर त्यातून आपल्याच शेतकरी बांधवांना चार पैसे मिळतात. शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडलेले विरोधकांना सहन होत नाहीत का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.या पत्रकार परिषदेतून शिवसेनेने वैभव नाईक आणि उबाठा गटाच्या आंदोलनाचा तीव्र शब्दात निषेध करत आगामी राजकीय संघर्षाचे संकेत दिले आहेत.