जिल्हा बँकेची ‘बँक सखी योजना’ महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी आदर्श ठरणार : कांचनताई परुळेकर. ओरोस येथे जिल्हा बँकेच्या 'बँक सखी' योजनेच्या शुभारंभ.
सिंधुदुर्ग.
महिला अर्थसाक्षर व्हाव्यात, सक्षम व्हाव्यात, व्यवसायाभिमुख व्हाव्यात यासाठी जिल्हा बँक ‘बँक सखी’ सारखा प्रकल्प राबवत आहे. महिला आर्थिक क्षेत्रात पुढे आली तर त्या क्षेत्रात खुप चांगले काम करु शकते. महिलांनी पैशाचा गुणाकार करायला शिकलं पाहिजे यासाठी बँक तुम्हाला साधन, सुविधा पुरवणार आहे पण खरा विकास तुमचा तुम्हालाच करायचा आहे. बँकेच्या पैशातुन तुमचे व इतरांचेही भले करण्याची संधी व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला मिळते आहे. या संधीचा सुयोग्य वापर करुन खूप चांगलं काम करुन समोरच्याला प्रेरित करणारे करावे असे स्वतःचे व्यक्तिमत्व तुम्ही बनवले पाहिजे. ही तुमच्यावरती मोठी जबाबदारी आहे. ‘बँक सखी’ सारखी योजना जिल्हा बँकेने तुमच्यासाठी तयार केलेली असून बँकेने आर्थिक मदतीचा हात पुढे केलेला आहे. याचा तुम्ही किती फायदा करून घेता आणि किती महिलांच्या पर्यंत पोहोचता हे फार महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्ग बदलायचा असेल तर ही बँक सखी योजना अत्यंत यशस्वीपणे तुम्ही राबवायला हवी. महीलांचे व्यक्तिमत्व विकास व त्यांचे आर्थिक सबलीकरण या उद्येशाने आपण त्यांना शिक्षण दिले पाहिजे. स्त्री मुक्तीच्या मागे न धावता विधायक कामातून ज्वलंत जागृक स्त्री उभी राहू शकते. आणि बँक ‘बँक सखी’ च्या माध्यमातून जिल्हा बँक हे काम करते आहे याचे मला कौतुक आहे. असे मार्गदर्शनपर प्रतिपादन स्वयंसिद्धा या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कांचनताई परुळेकर यानी शरद कृषी भवन, ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा बँकेच्या 'बँक सखी' योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांच्यात आर्थिक, सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. आज गाव पातळीवर स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून महिलांचे संघटन उभे राहत आहे. यासाठी बँकेने महिला विकास कक्षाची स्वतंत्रपणे स्थापना करून स्वयंसहायता बचत गटांना मार्गदर्शन करणे, आर्थिक सहाय्य करणे, त्यांच्या पाठीशी सक्षम उभे राहण्याचे काम केले आहे. महिला सक्षम व्हाव्यात यासाठी 'बँक सखी' सारखी योजना बँकेने सुरू करण्याचे ठरविले असून या योजनेचा शुभारंभ लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी दिनी मंगळवारी संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुरवातीस स्वयंसिद्धा या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कांचनताई परुळेकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन जिल्हा बँकेच्या ‘बँक सखी’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेच्या कर्जातून व्यवसाय उभारलेल्या यशस्वी लघु उद्योजक महीलांच्या यशोगाथेवर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषणात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर साहेब यांनी 'बँक सखी' योजनेबाबत माहितीपर विवेचन केले. कार्यक्रमात १७ बँक सखीना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी बँकेच्या यशस्वी उद्योजिकांचा सत्कार करण्यात आला.
आमदार नितेश राणे यांनी बोलतांना आपले विचार मांडले. जिल्हा बँक शेती, शेतीपुरक व्यवसाय तसेच विविध आर्थिक क्षेत्रात उत्पन्न वाढावे यासाठी सातत्याने काम करीत आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून महिलांना विविध व्यवसाय क्षेत्रात अधिकाधिक आर्थिक मदत कशी करता येईल याचा विचार सातत्याने जिल्हा बँक करीत आहे.बँकेच्या माध्यमातून महीलांना सक्षम करायचे असेल तर जिल्ह्यातील महीलांसाठी नव्या योजना आखुन त्या कार्यान्वित केल्या पाहिजेत आणि हेच जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. देशामध्ये, राज्यामध्ये महिलांना खऱ्या अर्थांने आर्थिक समृद्धी देणाऱ्या बँकामध्ये आपल्या जिल्हा बँकेचे नाव अग्रक्रमांकावर असले पाहिजे. हा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. कुठलीही योजना यशस्वी करावयाची असेल तर सगळ्यांशी संवाद साधणे, ती योजना शेवटच्या घटकापर्यंत कशी पोहोचेल या दृष्टीने त्याचा विचार करुन मार्ग सुकर करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे.
राष्ट्रीय संयुक्त सचिव भारतीय स्त्रीशक्ती वर्षा पवार-तावडे यांनी सांगितले की महिलांना नेहमीच बचत करण्याची सवय असते परंतु ही बचत योग्यरित्या गुंतवणूक करण्याची माहिती नसते. ही गुंतवणूक दागिन्यात नाही तर ती व्यवसायात करायची असते. हे नवीन शिक्षण आपल्याला आता आपल्याला घ्यायचे आहे.आज नियुक्त झालेल्या बँक सखींचे आत्मविश्वासाने परिपुर्ण चेहेरे या योजनेची यशस्वीता अधोरेखित करते. उद्योग करणारी महिलेची भविष्यातील पुढची पिढी जागृत होऊन व्यवसायाच्या मार्गाने प्रगती करत असते. आत्ताची स्त्री चुल आणि मुल सांभाळणारी अशा प्रतिमेमधुन बाहेर पडते याचे मला कौतुक वाटते. त्यातुन स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन आता बदललाच पाहीजे. आणि हा दृष्टीकोन बदलण्यासाठी आजची स्त्री आर्थिकदृष्या सक्षम झाली पाहिजे. या सक्षमीकरणासाठी जिल्हा बँकेच्या बँक सखीच्या माध्यमातून फार मोठी संधी मिळते आहे ही फार मोठी गोष्ट आहे.
जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी बोलताना असे म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सिंधुदुर्ग जिल्ह्या बँकेच्या ‘बँक सखी’ योजनेसारखा उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील सहकार क्षेत्रासाठी एक मॉडेल यंत्रणा म्हणून उभा करण्याचा आमचा प्रयत्न आणि संकल्प आहे.त्यामध्ये आम्ही निश्चीतपणे यशस्वी होणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत. यासाठी आम्ही अविरत कार्य या पुढच्या काळामध्ये करण्यासाठी कटिबद्ध आहोत. जिल्हा बँक म्हणून आपण जो विश्वास आमच्यावर टाकला तो विश्वास सार्थकी लावण्याची जबाबदारी आमची सगळ्यांची आहे त्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही.बँक सखीच्या माध्यमातून मदतीचा जो हात आम्ही पुढे केला आहे.त्यातून आपला व्यवसाय उभा करण्यासाठी प्रयत्न करून आपल्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या उत्पन्नाबरोबर जिल्ह्याचेही दरडोई उत्पन्न वाढेल. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाचा शाश्वत विकास झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन काम केले पाहिजे. आपल्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा बँक कायम आपल्या सोबत आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सर्वश्री विठ्ठल देसाई, रविंद्र मडगांवकर, प्रकाश बोडस, गजानन गावडे, विद्याधर परब, समीर सावंत, संचालिका प्रज्ञा ढवण, नीता राणे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका प्रज्ञा परब, कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, माजी जि.प.अध्यक्षा सरोज परब,श्वेता कोरगांवकर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, भगिरथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सी.आर.पी. प्रतिनिधी मोठ्या उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन ज्योती तोरसकर यांनी केले.