इंधन वायू घेऊन 'नंदा देवी'चेही आगमन...स्वयंपाकाच्या गॅसची स्थिती सुधारणे शक्य

इंधन वायू घेऊन 'नंदा देवी'चेही आगमन...स्वयंपाकाच्या गॅसची स्थिती सुधारणे शक्य

 

नवी दिल्ली

 

  भारतात स्वयंपाकाच्या गॅसची स्थिती आता आणखी सुधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरात आगमन झालेल्या 'शिवालिक' या वायूवाहक नौकेनंतर आता 'नंदा देवी' नामक आणखी एक नौका गुजरातच्या वाडीनार बंदरात आलेली आहे. ही नौका भारताच्या 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' ची आहे. या नौकेत ४७ हजार टन द्रवीभूत पेट्रोलियम गॅस असल्याची माहिती देण्यात आली असून गेल्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात इंधन वायू भारतात आला आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नंदा देवी ही नौका पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार गुजरातमधील कांडला बंदरात आणली जाणार होती. तथापि, धोरणात्मक परिवर्तन करुन ती वाडीनार बंदरातआणण्यात आली आहे. या बंदरात नौकेतून गॅस लवकर अनलोड करण्याची सोय आहे. त्यामुळे गॅसच्या अनलोडिंगसाठी फारसा वेळ लागणार नाही. अनलोडिंग झाल्यानंतर इंधन वायू त्वरित देशभर वितरणासाठी पाठविला जाणार आहे. भारताची इंधन वायूची दैनंदिन आवश्यकता साधारणतः १ लाख टन इतकी आहे. तामिळनाडूला २४ हजार टन देणार. गेल्या दोन दिवसांमध्ये भारतात ९२ हजार ७०० टन इंधन वायू आलेला आहे. यापैकी २४ हजार टन वायू तामिळनाडूला पाठविण्यात येणार आहे. इतर राज्यांनाही त्यांच्या मागणीनुसार तो पाठविण्यात येणार आहे. ही वाहतूक होण्यासाठी साधारणतः आणखी दोन दिवस लागू शकतात, असे स्पष्ट केले गेले.
भारताने सातत्याने इराणच्या प्रशासनाशी चर्चा चालविली आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर हे इराणच्या मंत्र्यांची चर्चा करीत आहेत. भारताच्या तेलवाहक आणि वायूवाहक नौकांना होमुझच्या सामुद्रधुनीतून विनासायास बाहेर पडता यावे, यासाठी ही चर्चा आहे. गेल्या चार दिवसात भारताच्या अनेक नौका अशा प्रकार सुखरुप बाहेर पडल्या आहेत.