रत्नागिरीतील समुद्रकिनारे ठरतायत पर्यटकांचे आकर्षण; वाॅटर स्पोर्ट्साठी पर्यटकांची पसंती.

रत्नागिरीतील समुद्रकिनारे ठरतायत पर्यटकांचे आकर्षण; वाॅटर स्पोर्ट्साठी पर्यटकांची पसंती.

रत्नागिरी.

   अथांग समुद्र, किनाऱ्यावरील वाळूवरील खेळ, समुद्राच्या लाटा त्या अंगावर घेत केली जाणारी माैजमजा, शिवाय वाॅटर स्पोर्ट्स, झीपलाईन, पॅरासेलिंग, स्कूबा ड्रायव्हिंगमुळे पर्यटकांची पावले रत्नागिरी तालुक्यात वळत आहेत.
  तालुक्यातील गणपतीपुळे, मालगुंड, वरवडे, काजिरभाटी, आरे-वारे, मांडवी, भाट्ये, झरीविनायक, पूर्णगड, गणेशगुळे, गावखडी या समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. श्रीक्षेत्र गणपतीपुळे, पावस येथील स्वामी स्वरूपानंद मंदिर, गणेशगुळेचे गणपती मंदिर ही प्रमुख देवस्थाने असून, या ठिकाणी भक्तांची गर्दी होते. समुद्रकिनाऱ्याचे पर्यटकांना विशेष आकर्षण असल्यामुळे भाविक धार्मिक स्थळांना भेटी देण्याच्या निमित्ताने आजूबाजूच्या समुद्रकिनाऱ्यावर गर्दी करत असतात. समुद्रस्नान हा आवडीचा भाग. याच्या जोडीला किनाऱ्यावर कुटुंबातील सदस्यांबरोबर खेळ रंगतात. त्याचबरोबर वाॅटर स्पोर्ट्स, झीपलाईन, पॅरासेलिंग, स्कूबा ड्रायव्हिंगचाही आस्वाद पर्यटक घेतात.
   समुद्रकिनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटा अंगावर घेत समुद्रस्नानाचा आनंद घेतला जातो.पर्यटकांसाठी जलक्रीडांचे विविध प्रकार उपलब्ध असून,पर्यटक याचा आस्वाद घेतात. वाॅटर स्पोर्ट्सबरोबर स्कूबा ड्रायव्हिंगमध्ये समुद्राच्या अंतर्भागाचे साैंदर्य पाहता येते.पॅरासेलिंग, झीपलाईन मात्र धाडसी पर्यटक करू शकतात.मात्र, ते पाहण्यासाठीही पर्यटकांची गर्दी होत असते. गणपतीपुळे, मांडवी, भाट्ये किनाऱ्यावर प्रचंड गर्दी असते.हल्ली आरेवारे, काजिरभाटी बिचेसवरही गर्दी वाढू लागली आहे. गर्दीमध्ये जाण्याचा कंटाळा करणाऱ्या पर्यटकांची पावले पूर्णगड, गणेशगुळे, गावखडी समुद्राकडे वळू लागली आहे. पर्यटकांसह स्थानिकही वनडे पिकनिकसाठी या ठिकाणांची निवड करत आहेत.सुटी तसेच वीकेंडला या बिचेसवरही गजबज अधिक असते.