केसरकर व राणेंना मंत्रीपद मिळू नये म्हणून भाजप जिल्हाध्यक्षांच्या तक्रारी......शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा टोला

केसरकर व राणेंना मंत्रीपद मिळू नये म्हणून भाजप जिल्हाध्यक्षांच्या तक्रारी......शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा टोला

 

सावंतवाडी
 

     भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना आमच्या तक्रारी करायच्या होत्या तर त्यांनी जिल्ह्याचे नेते आणि सर्वेसर्वा असलेल्या नारायण राणे यांच्याकडे करणे गरजेचे होते. मात्र केवळ शिवसेनेचे नेते, दीपक केसरकर आणि निलेश राणे यांना मंत्रीपद मिळू नये म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे केला.दरम्यान आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुमचे कार्यकर्ते तुम्हाला सांभाळता येत नाहीत याचे आत्मचिंतन करा. आम्ही केसरकरांच्या शब्दाला लागून गप्प आहोत. त्यामुळे दबाव तंत्राचा वापर नको, अन्यथा दुपटीने काय तिपटीने प्रवेश घेऊ, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हा भाजप आणि शिवसेनेत पक्षप्रवेशावरून अंतर्गत कुरबूर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी या प्रकाराच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. तसेच शिवसेनेचे पदाधिकारी महायुतीत खडा टाकत असल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन या आरोपाला प्रत्युत्तर दिले. यावेळी तालुकाध्यक्ष नारायण राणे, शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, परीक्षीत मांजरेकर, अर्चित पोकळे, निखिल सावंत, क्लेट्स फर्नांडिस, झेवियर फर्नांडिस, बंटी पुरोहित आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. परब पुढे म्हणाले, प्रभाकर सावंत यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे सेनेवर आरोप केले होते. यात प्रलोभने आणि आमीषे दाखवून सावंतवाडी व कुडाळ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा प्रवेश घेतला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे नारायण राणे हे त्यांचे गुरु आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून शिकावे, असे त्यांनी म्हटले होते. यावर श्री. परब म्हणाले, आमचे गुरु हे नारायण राणेच आहे. त्यामुळे ते सांगण्याची सावंत यांना गरज नाही. त्यांना जर आमच्या विरोधात तक्रारी होत्या तर त्यांनी नारायण राणे यांच्याकडे तक्रार करणे गरजेचे आहे. मात्र थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्याची गरज नव्हती. या ठिकाणी तुमचे भाजपचे कार्यकर्ते लवचिक आहेत. त्यामुळे ते अन्य ठिकाणी का जातात? त्यांना तुम्ही का सांभाळू शकत नाहीत, याचे तुम्ही आत्मचिंतन करा. आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुमची साथ ते का सोडत आहे? याबाबत विचार करा, असे ते म्हणाले. आम्ही या ठिकाणी पक्षप्रवेश घेण्यासाठी कधीही तयार आहोत. अन्य पक्षातील कार्यकर्ते आमच्यात येण्यासाठी तयार आहेत. परंतू केवळ दीपक केसरकर यांच्या शब्दाला लागून आम्ही पक्षप्रवेश थांबविले आहेत. त्यामुळे महायुतीत मिठाच्या खडा टाकण्याचा त्यांनी केलेला आरोप सपशेल चुकीचा आहे, असे परब म्हणाले. सावंत यांनी शिवसेनेतील कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्याचा इशारा दिला आहे. परंतु त्यांना घ्यायचेच असतील तर त्यांनी कधीही प्रवेश घ्यावेत. आमचे कार्यकर्ते हे निष्ठावंत व दीपक केसरकर आणि निलेश राणे यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे दबाव तंत्र त्यांनी दाखवून देऊ नये. या ठिकाणी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुमचे कार्यकर्ते अन्य ठिकाणी का जातायेत? याचा विचार करावा. या ठिकाणी आम्ही नारायण राणे यांचे कार्यकर्ते आहोत, ते आमचे गुरु आहेत, हे सांगायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही. परंतू थेट अशा जिल्ह्यातील गोष्टींचे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणे म्हणजे यामागे काहीतरी षडयंत्र असल्याचा वास येत आहे. आमचे नेते दीपक केसरकर व निलेश राणे यांना मंत्रीपद मिळू नये म्हणून काही लोकांचे प्रयत्न सुरू आहेत आणि यामागे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना बोलवणारा धनी वेगळा आहे. मी त्यांना जवळून ओळखतो ते असे काही करणार नाहीत परंतु नक्कीच त्यांनी आत्मचिंतन करावे. स्वबळाची भाषा त्यांची असेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत. दोडामार्ग सोसायटीत याचे आम्ही उदाहरण दाखवून दिले होते. त्यामुळे ११ सदस्यांचा सत्कार करण्यासाठी गाडीच्या बंद काचा करून तेथे गेलेल्या भाजपच्या काही नेत्यांना नेलेले हार परत आणावे लागले होते, असा टोला त्यांनी लगावला.सावंतवाडी शहरात प्रशासनाच्या मनमानी कारभारात त्यांना छेडले असता येत्या आठ दिवसात शहरातील कचरा, आरोग्य, स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.