कोकणात पावसाचा कहर; पुढील २-३ दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता.

कोकणात पावसाचा कहर; पुढील २-३ दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता.

पुणे.

   राज्यात पावसाचा जोर कायम आहे. पुढील दोन तीन दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, पालघर, ठाणे जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही तासांत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, सोलापूर, लातूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, जळगाव, धुळे, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
    पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या संपूर्ण भागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण, गोव्यात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी खूप जोरदार व मराठवाड्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १५ तारखेला मराठवाडा व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी खूप जोरदार तर १६ तारखेला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
   १७ व १८ तारखेला विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत्या ४८ तासात अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरीला दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागासाठी आज रेड अलर्ट दिलेला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस व सातारा येथील घाट विभागासाठी पुढील पाच दिवस ऑरेंज दिलेला आहे. रायगड आणि पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागासाठी पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.