लाडघर-बुरोंडी समुद्रात मत्स्यव्यवसायची एल.ई. डी. नौकेवर कारवाई

रत्नागिरी
समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्यानंतर रत्नागिरीचे मत्स्य व्यवसाय खाते ऐक्शन मोड वर आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दापोली तालुक्यातील लाडघर-बुरोंडी समुद्रामध्ये एल.ई.डी. लाईट वापरणाऱ्या नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. या नौकेवर तांडेलसह 4 खलाशी होते. सदर नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे. लाडघर बुरोंडी समोर 17°42'15.9"N 72°56'41.6"E मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर) स्वप्निल चव्हाण हे स्थानिक लोकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने गस्त घालत होते. यावेळी राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली यासिन अब्दुल गफूर मुकादम, रा. खडप मोहल्ला, रत्नागिरी यांची नौका अब्दुल गफूर -नों. क्र. IND-MH -4-MM-6007 द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात लाडघर-बुरोंडी समोर अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट वापरत असल्याचे निदर्शनास आले. ही बोट विभागाने पकडली. या नौकेवर नौका तांडेलसह 4 खलाशी होते.सदर नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे आणि त्यावर मासळीचा आढळून आलेली नाही. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त केली आहेत. सदर कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी सागर कुवेसकर व मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, रत्नागिरी आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी दीप्ती साळवी, स्वप्निल चव्हाण, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक दाभोळ प्रशांत येलवे, सागरी सुरक्षा रक्षक योगेश तोस्कर, राजन शिंदे, मंदार साळवी व गस्ती नौका रामभद्रा वरील कर्मचारी ज्ञानेश्वर अजगोलकर, विशाल यादव, शिवकुमार सिंग यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे.