७ ऑगस्ट रोजी गोवा येथे ओबीसी महासंघाचे १० वे राष्ट्रीय अधिवेशन

७ ऑगस्ट रोजी गोवा येथे ओबीसी महासंघाचे १० वे राष्ट्रीय अधिवेशन

 

कुडाळ

 

     ओबीसी महासंघाचे १० वे राष्ट्रीय अधिवेशन येत्या ७ ऑगस्टला गोवा येथे होणार आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, गोवा युनिव्हर्सिटी जवळ, गोवा येथे होणाऱ्या या ओबीसी महासंघाच्या दहाव्या अधिवेशनला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २ हजार ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत. त्याबाबतचे नियोजन ओबीसी महासंघाच्या बैठकीत करण्यात आले.या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने ओबीसी महासंघाची बैठक एमआयडिसी विश्रामगृहावर अलीकडेच झाली. या अधिवेशनाच्या नियोजनासाठी हि बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ओबीसी महासंघ जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री, ओबीसी महासंघ कार्याध्यक्ष सुनील भोगटे, सुवर्णकार समाज नेते काका कुडाळकर, भंडारी समाजाचे नेते अतुल बंगे, नाभिक समाज जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, गवळी समाजाचे श्री. पधारे, भंडारी समाज सदस्य बाळू साळगावकर उपस्थित होते. बैठकीत गोवा येथील अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली. हे अधिवेशन डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, गोवा युनिव्हर्सिटी जवळ, गोवा येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील ओबीसींना गोवा येथे नेण्याबाबत नियोजन करण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाची संघटना मजबूत करण्याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. जिल्हाभरातून सुमारे दोन हजार ओबीसी बांधव या अधिवेशनाला उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात आले.भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण मिळाल्याबद्दल बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले. या निर्णयामुळेच ओबीसी समाजाला महत्त्वाचे स्थान या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत असे सांगताना काही अडचणींवरदेखील विचार विनिमय करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने ओबीसी समाजाला शासकीय सेवेत पदोन्नती देताना ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावर चर्चा करण्यात आली. सर्व जिल्ह्यांमध्ये वसतिगृह होण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. इतर प्रत्येक समाजाच्या समस्यांबाबत त्यात्यावेळी योग्य तो निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी जातनिहाय जनगणना लवकर करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. ओबीसी, विज, विशेष मागासवर्गीय समाजाच्या रिक्त पदाचा अनुशेष त्वरित भरण्यात यावा अशाप्रकारच्या विविध प्रमुख मागण्याबाबत चर्चा करण्यात येऊन ७ ऑगस्ट रोजी गोवा येथे होणाऱ्या अधिवेशनला निवेदन देऊन पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले आहे.