पिंपरी-चिंचवडमध्ये अग्नितांडव; कुदळवाडीत ३ कंपन्या जळून खाक; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.

पुणे.
पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात आज गुरुवारी एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. रबर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीला ही भीषण आग लागली. आज गुरुवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली. एका कंपनीला आग लागल्यानंतर शेजारील दोन कंपन्यांनाही आग लागली. या आगीच तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या कुदळवाडी परिसरात रबर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीला आगलागल्याची घटना घडली. एका कंपनीच्या आगीमुळे शेजारी- शेजारी असणाऱ्या तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. कुदळवाडी परिसरातील आर के ट्रेडर्स मॅन्युफॅक्चरिंग आणि शेजारी असणाऱ्या अन्य दोन कंपन्यांना भीषण आग लागली आहे. आज गुरुवार असल्यामुळे कंपन्यामधील कर्मचारी नससल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या १५ पेक्षा अधिक अग्निबंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.