वेंगुर्लेत सोने लुटणे व शिव लग्न सोहळा उत्साहात संपन्न

वेंगुर्ला
विजयादशमीच्या पवित्र दिवशी वेंगुर्ले येथे सोने लुटण्याची परंपरा आणि शिव लग्न सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.तळकोकणातील हा डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा अनुभवण्यासाठी जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.नवरात्र उत्सवाची सांगता दसऱ्याने होते. या दिवशी रामेश्वर मंदिरात अनादी काळापासून चालत आलेली सोन लुटण्याची परंपरा भाविकांनी जपली. या परंपरेनुसार, परब मानकरी आणि गावकऱ्यांच्यावतीने तहसीलदार यांच्या हस्ते पुरोहितांकरवी आपट्याच्या झाडाचे पूजन करण्यात आले. या पूजनानंतर हजारो भाविकांनी या आपट्याच्या झाडाची पाने लुटली. तळकोकणात या पानांनाच 'सोन लुटणे' मानले जाते. ही सोन्याची पाने एकमेकांना देऊन भाविकांनी या उत्सवाचा आनंद घेतला.सोन लुटण्याच्या कार्यक्रमानंतर हे हजारो भाविक वेंगुर्ले येथील रवळनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शिव लग्न सोहळ्यासाठी दाखल झाले. वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिरातून तरंग देवता या सोहळ्यासाठी रवळनाथ मंदिर येथे येतात. हा सोहळा म्हणजे रवळनाथ आणि शक्ती यांचा विवाह सोहळा असतो. यावेळी पाहुणाई व रवळनाथ-भूतनाथ अशा तरंगदेवता या सोहळ्यात उपस्थित असतात. पुरोहितांकरवी मंगलमय वातावरणात मंगलाष्टके म्हणून हा शिव लग्न सोहळा पार पाडला गेला. लग्नाचे सर्व विधी पार पडल्यानंतर देव पावणेरला जातात.अनादी काळापासून तळकोकणात जपल्या गेलेल्या या पारंपरिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी यंदाही हजारो भाविकांनी रवळनाथ मंदिराच्या परिसरात गर्दी केली होती. धार्मिक पावित्र्य आणि पारंपरिक उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.