रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा.
पुणे.
राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. वरील तिन्ही जिल्ह्यांना १६ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबईला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, साताराच्या घाट विभागात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात देखील सर्व जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. तर पुण्यात देखील सकाळ पासून रात्री पर्यंत संततधार सुरू होती. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आज पासून पुढील पाच दिवस कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात दोन दिवस काही ठिकाणी तर विदर्भात आज काही ठिकाणी तर उद्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची हवामान विभागाने वर्तवली आहे. आज ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे साताऱ्याच्या घाट विभागात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील घाट विभागात दिनांक १४ व १५ जुलै रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर साताऱ्याच्या घाट विभागात दिनांक १६ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यातील घाट विभागात २४ तासात तुरळक ठिकाणी खूप जोरदार म्हणजे ११६ ते २०४ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर जळगाव, पालघर, सिंधुदुर्ग आणि नाशिक, मुंबई, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट विभागात २४ तासात जोरदार म्हणजे ६५ मिलिमीटर ते ११५ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज नाशिक जिल्ह्याच्या घाट विभागात व यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची म्हणजे ६५ ते ११५ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक १४, १५ व १६ जुलै रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे व शहर परिसरात पुढील चार दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात २४ तासात काही ठिकाणी जोरदार पाऊस म्हणजे ६५ ते ११५ मिलिमीटर तर उद्यापासून जोरदार म्हणजे ११६ मिलिमीटर ते २०४ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.